You are currently viewing राजकारणातील जाणते नेतृत्व

राजकारणातील जाणते नेतृत्व

उद्योगमंत्री नारायण राणे वाढदिवस अभिष्टचिंतन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना रुजली होती, परंतु नावारुपास आली नव्हती. त्याचवेळी मुंबईतून नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देत जिल्ह्यात पाठविण्यात आले. आणि तिथूनच शिवसेनेने जोरदार मुसंडी मारून जिल्ह्यात भगवे वादळ आले. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि राजकारणातील गावकर शाही संपली. पूर्वी गावातील देवस्थानचा मानकरी हाताशी धरला की एकगठ्ठा मतदान व्हायचं. त्यामुळे गावकर शाहीला वेगळे स्थान आणि मान होता. त्यामुळे शिवसेना जी चाकरमानी तरुणांना हाताशी धरून घराघरात पोचण्याचा प्रयत्न करत होती, धडपडत होती त्यांचे गावकर शाहीपुढे काही चालत नव्हते. परंतु राणेंची एन्ट्री झाली आणि शिवसेना गावागावात पोचली, घराघरात शिवसैनिक जन्माला आला.
नाम.नारायण राणेंचा हात धरून अनेक छोटे छोटे कार्यकर्ते नेते, लोकप्रिनिधी झाले. अनेकांनी लाल दिव्यांच्या गाड्यांमधून मोठेपणा मिरवला. तळागाळात काम करणारे परंतु जनमानसात ओळख नसणाऱ्याना “राणेंचा माणूस”…”दादांचा कार्यकर्ता” अशा ओळखी मिळाल्या. तळागाळातील अनेक कार्यकर्ते आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले, वातानुकूलित गाड्यांमधून फिरू लागले. काहींनी बंगले, हॉटेल्स, फार्म हाऊस बांधले, मोठमोठ्या मिळकती विकत घेत बागायतदार झाले, व्यावसायिक, उद्योजक बनले. पैसा, प्रतिष्ठा मिळाली. हा, कशी मिळाली किंवा मिळवली हा संशोधनाचा विषय आहे. परंतु जनमानसात मोठा माणूस म्हणून ओळख मिळाली.
नाम.नारायण राणे यांनी आमदार पासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे मिळवली. राज्यातच नव्हे देशाचा राजकारणातील एक हुशार माणूस म्हणून ओळख मिळवली. शब्दांना वजन आणि मान मिळाला. परंतु राणेंच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जिल्ह्यातील गावागावात रस्ते झाले, जिथे एस टी जाणे हे स्वप्न वाटायचं तिथे गाड्या गेल्या, वीज पोचली, जिल्ह्याचा कायापालट झाला, जिल्ह्याला देशात ओळख मिळाली. राज्यातील सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा बनला. जिल्ह्यात विमानतळ होण्यासाठी देखील राणेंनी अथक प्रयत्न केले. नाम.राणेंनी जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यातील युवा वर्गाला जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची सोय झाली. गोव्याकडे उपचारासाठी धावणारा बराचसा व्याधीग्रस्त वर्ग जिल्ह्यातच उपचार घेऊ लागला. नाम. राणेंकडे असलेल्या लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग खात्यामुळे जिल्ह्यात उद्योगाची गंगा येण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेली तीन दशके जिल्हा विकासाची स्वप्ने उराशी बाळगून राजकारण आणि समाजकारण करत अनेकांना मदतीचा हात देऊन उभे करणाऱ्या दादांना संवाद मिडीयाकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा