You are currently viewing संजू परब यांना जिल्हा नेतृत्व सावंतवाडी मतदारसंघापासून दूर ठेवते का?

संजू परब यांना जिल्हा नेतृत्व सावंतवाडी मतदारसंघापासून दूर ठेवते का?

भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत संजू परब मालवणचे प्रभारी..

संपादकीय……

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक काल कुडाळ येथे पार पडली. देश पातळीवर केंद्रातील भाजपा सरकार करत असलेले कार्य, आखत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्या संदर्भात कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. याच बैठकीत जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे मालवणचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.
संजू परब काँग्रेसमध्ये तालुकाप्रमुख असताना सावंतवाडी तालुक्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्राबल्य मोडून काढत जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीतजास्त जागा निवडून आणल्या होत्या. इतकेच नव्हे तर सावंतवाडीत केसरकरांचे १७/१७ नगरसेवक होते त्याच नगरपलिकेत काँग्रेसच्या ८ जागा निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतरच्या काळात स्वाभिमान पक्षाची स्थापना झाली आणि काही वर्षांत स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्यावरही सावंतवाडी नगरपलिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून निवडून येत सावंतवाडीवर दीपक केसरकर यांची २३ वर्षे असलेली सत्ता उलथून टाकली होती.
संजू परब यांची राजकारणातील घोडदौड पाहता सावंतवाडी मतदारसंघाचे भाजपातून पुढील विधानसभेसाठी तेच मुख्य दावेदार आहेत. मागील निवडणुकीत आताचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजन तेली सावंतवाडीतून उमेदवार होते, ते १३००० च्या फरकाने पराभूत झाले होते. येत्या विधानसभेसाठी संजू परब हे सावंतवाडीतून इच्छुक होते त्यामुळेच वेंगुर्ला, दोडामार्ग या सावंतवाडी मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांची जबाबदारी त्यांच्यावर न देता मालवण या त्यांच्या कार्यक्षेत्रात न येणाऱ्या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून त्यांना बाजूला करण्यात जिल्हा नेतृत्वाने यश मिळविले आहे.
वेंगुर्ला दोडामार्ग या तालुक्यांची जबाबदारी संजू परब यांच्यावर दिली असती तर ते विधानसभेच्या दृष्टीने मतदारसंघाची बांधणी करू शकले असते. ग्राउंड लेव्हलवर संजू परब हे उत्तम कार्य करतील, आणि विधानसभेसाठी प्रबळ दावेदार ठरतील हीच भीती मनात असल्याने जिल्हा नेतृत्वाने एक उत्तम खेळी खेळत संजू परब कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाच त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढण्यात आला. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचा काटेरी मुकुट सांभाळत संजू परब हे वेंगुर्ला, दोडामार्गाची अतिरिक्त जबाबदारी नक्कीच पार पाडू शकले असते. कारण त्यांच्याकडे तरुण वर्गाची मजबूत फळी आहेच आणि उत्तम संघटन कौशल्य आहे. कोरोनामधून बाहेर पडल्यावर जिल्हा नेतृत्वाने दिलेली नवी जबाबदारी संजू परब खांदावर घेतात की आपली पुढील रणनीती तयार करण्याकरिता वेंगुर्ला, दोडामार्ग साठी जबाबदारी मागून घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =