You are currently viewing रिल्स मालवणी स्पर्धेमध्ये देवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ प्रथम

रिल्स मालवणी स्पर्धेमध्ये देवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ प्रथम

देवगड

मालवणी नटसम्राट कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या ४ एप्रिल वाढदिवसानिमित्त सर्वत्र मालवणी बोलीभाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी मालवणी बोलीभाषा दिनाचे अवचित्य साधून इंस्टाग्राम वरील रिल्स मालवणी या कुडाळ मधील ग्रुप ने ‘सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो’ या धर्तीवर मालवणी भाषेचा निरनिराळ्या क्षेत्रात प्रचार करत असलेल्या व्यक्तींसाठी मालवणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
या पुरस्कार सोहळ्याच्या अनुषंघाने आणि मालवणी बोलीभाषा दिनानिमित्त ‘सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो’ हा विषय देऊन सर्वोत्कृष्ट इंस्टाग्राम मालवणी रिल स्पर्धा देखील ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मालवणी भाषीक आणि मालवणी इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून बरेच रिल्स विडिओ स्पर्धेमध्ये दाखल झाले होते
देवगड बाजारपेठ मधील युवा कलाकार ऋत्विक प्रल्हाद धुरी आणि आकाश सुनील सकपाळ या दोघांनी बनवलेल्या रिल्सला संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांना समर्पित रिल्स विडिओ बनवत त्यांनी सर्वांची मने जिंकली. मालवणी बोलीभाषा दिन ४ एप्रिललाच का ?, बाबूजी म्हणजे कोण ?, बाबूजींनी नेमके काय केले ?, असे सर्व आत्ताच्या पिढीला पडणारे प्रश्न मांडत त्यांनी, मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटकांच्या शिर्षकातून त्यांचं महत्व आणि मालवणी भाषेचा त्यांनी केलेला प्रचार हा फक्त दीड मिनिटाच्या रिल्स मध्ये मांडला. ऋत्विक धुरी याचे उत्कृष्ट लेखन, आकाश सकपाळचे सुसज्ज संकलन, संकल्पना, मांडणी, अभिनय या सर्वांच्या जोरावर त्यांची रिल्स सर्वोत्कृष्ट ठरली.
४ एप्रिल ला कुडाळ मराठा समाज हॉल येथे झालेल्या रिल्स मालवणी पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट मालवणी रिल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी बनवलेल्या रिल्सचे सर्वत्र कौतुक होत असून ती रिल सोशल मीडिया वर वायरल होत आहे. स्वतः प्रसाद मच्छिंद्र कांबळी आणि भद्रकाली प्रॉडक्शन च्या माध्यमातून देखील बाबूजींनबद्दल तयार केलेल्या या कलाकृतीचे कौतुक करण्यात आले आहे. ही रिल reels_malvani किंवा rutvik.rangkarmi.7117_ या इंस्टाग्राम पेज वरती आपण पाहू शकता..

प्रतिक्रिया व्यक्त करा