मालवण
देशातील विविध राज्यातील संस्कृती, परंपरा यासह तेथील निसर्ग सौंदर्य, पर्यटन याचा अभ्यास, अनुभव घेण्यासाठी हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र अशा चार राज्यातून एकटीने सायकल प्रवास करणाऱ्या सोनल अग्रवाल या ३४ वर्षीय तरुणीने मालवणला भेट दिली. येथील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, किल्ले सिंधुदुर्ग, पर्यटन याचा आनंद घेत भरभरून कौतुक केले.
गुडगाव दिल्ली येथील सोनल अग्रवाल हिने नोव्हेंबर २०२२ मध्ये दिल्ली ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा पाच महिन्याचा सायकल प्रवास करत त्या कोकणातील मालवण येथे दाखल झाल्या. त्यांनी चिवला बीच येथील गुरुनाथ राणे यांच्या गुरुज किचनला भेट दिली. पर्यटन अभ्यासक असलेल्या राणे यांच्या आदरातिथ्याने ती भारावून गेली. त्यांच्या या सायकल प्रवासाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, मुळात शिक्षकी पेशात असताना यातून थोडासा ब्रेक घेत देशातील विविध राज्यातील संस्कृती, परंपरा, पर्यटन यासह अन्य माहितीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिल्ली ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा पाच महिन्यांचा सायकल प्रवास करत आज मालवणात दाखल झाले. या चार राज्यांमधून प्रवास करताना त्या त्या राज्यातील संस्कृती, परंपरा, चालीरीती, खाद्यसंस्कृती, आदरातिथ्य स्थानिकांशी संवाद यातून बराच चांगला अनुभव मिळाला. मालवणात प्रवेश करताना कोकणातील हिरवेगार निसर्ग सौंदर्य हे मनाला वेड लावून गेले. येथील किल्ले सिंधुदुर्ग, समुद्र, स्वच्छ किनारे, पर्यटन, आदरातिथ्य पाहून भारावून गेले. सायकल प्रवास करताना चांगले अनुभव मिळाले. जे सेव्हिंग केले त्यातूनच सायकल प्रवास, जेवण अन्य खर्च करत आहे. स्वतःचा तंबू असून निवासासाठी त्याचा वापर करत आहे. आता यापुढे गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू असा प्रवास करणार असल्याचे तिने स्पष्ट केले. तिच्या या सायकल प्रवासासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.