मालवण :
आचरा हिर्लेवाडी येथील सुमारे ११० वर्षापुर्वीच्या हनुमान मंदिरात बुधवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हिर्लेवाडी माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.आचरा हिर्लेवाडी येथील कै नानाजी खोत यांनी १९१३ साली त्यांची मातोश्री गंगामाई खोत हिच्या स्मरणार्थया मारुती मंदिरा ची उभारणी केली आहे. त्याचे बांधकाम तत्कालीन शिल्पकार राजाराम कांबळी यांनी केले असल्याचे मंदिरावरील शिलालेखावरून स्पष्ट होते.
या मंदिराबाबत माहिती देताना हिर्लेवाडी येथील लवू मालंडकर सांगतात येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर कांबळी यांनी पुढाकार घेऊन या मंदिर परीसराची साफसफाई करुन लाईटसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच कार्यक्रमासाठी रंगमंचही उभारला. तसेच पाण्यासाठी बोअरवेल ही खोदली. या प्रेरणेतूनच हिर्लेवाडी माघी गणेश जयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत यामंदिराच्या चिरेबंदी बांधकामावर प्लॅस्टर सह रंगरंगोटी करून आकर्षक बनविले आहे. हिर्लेवाडी येथील प्राथमिक शाळेलगतच्या डोंगर माथ्यावर असलेले हे मंदिर भाविकांसाठी पर्यटन केंद्रबिंदू ठरणार असल्याचे लवू मालंडकर, आचरेकर सांगतात. या दृष्टीने हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.