You are currently viewing इन्सुली येथील ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधातील उपोषण स्थगित

इन्सुली येथील ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधातील उपोषण स्थगित

तो सामंजस्याचा मार्ग कोणता..?

इन्सुली येथील काळ्या दगडांच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणावर दगड, खडी वाहतूक गोव्याकडे होत असते. क्षमतेपेक्षा जास्त माल भरून जाणारे भरधाव डंपर अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतात, पादचारी, वाहन चालक आदी नागरिकांना त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरटीओ अधिकाऱ्यांना याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली, उपोषणे केली परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी उद्धव ठाकरे शिवसेना विभागप्रमुखांनी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांना सोबत घेत ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात उपोषण छेडले होते.
इन्सुली येथील उपोषणाला सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याची जबाबदारी असलेले कणकवली येथील शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट दिली. पारकर यांनी ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले त्याचबरोबर परिवहन विभागाचे अधिकारी व डंपर व्यावसायिक यांच्याशी देखील चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढला. उपोषणकर्ते ग्रामस्थांची मागणीवर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची भूमिका घेत पुन्हा अशाप्रकारे उपोषण करण्याची वेळ येणार नाही असे सांगितले. ग्रामस्थ व डंपर व्यावसायिक यांच्यात चर्चा करून सामंजस्याचा मार्ग काढण्यात आल्याने विभाग प्रमुखांना केलेले उपोषण मागे घेण्यात आले. नक्कीच प्रशासन यावर तोडगा काढेल व सर्वजण त्रासातून मुक्त होतील अशी आशा संदेश पारकर यांनी व्यक्त केली.
इन्सुली येथील ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात अनेकांनी उठाव केला परंतु डंपर व्यावसायिक कोणालाही बधले नाहीत, तर त्यांनी परिवहन विभाग आदींना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक सुरूच ठेवली होती. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता, उपोषण केल्याचे नक्की फलित काय…? तो काढण्यात आलेला सामंजस्याचा मार्ग म्हणजे नक्की काय ठरलं..? की यातही काही साटेलोटे झालेत…आणि ग्रामस्थ अनभिज्ञ राहिलेत…? सामंजस्याचा मार्ग काय हे न समजल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुन्हा ओव्हरलोड वाहतूक सुरू झाल्यास नक्कीच तो समजास्याचा मार्ग काय..? याची उकल होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा