भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सवाल
शिवसेना आणि भाजपा राज्यात एकत्र सत्तेत, सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर हे राज्याच्या मंत्रीमंडळात शालेय शिक्षण तथा मराठी भाषामंत्री म्हणून पदावर आहेत. मागील जवळपास १३ वर्षे आमदार, मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. राज्याच्या मंत्रीमंडळात एक जाणकार, अभ्यासू व हुशार व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या अभ्यास, हुशारी आणि अनेक भाषांवर असलेल्या प्रभुत्व यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी देत शिवसेना फुटीची खिंड लढवली होती ही वस्तुस्थिती आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजपा असो किंवा आताची उद्धव ठाकरे शिवसेना विरोधकांना धास्ती वाटते ती मितभाषी आणि धूर्त राजकारणी असलेल्या नाम.दीपक केसरकर यांचीच.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर, मा.राज्यमंत्री प्रवीण भोसले, नाम.नारायण राणे, आणि खुद्द राजन तेली यांनी सुद्धा केसरकरांचे राजकारण फार जवळून पाहिले आहे. केसरकरांना चितपत करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु सावंतवाडी, वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातील जनतेने वेळोवेळी केसरकर यांच्या शांत संयमी राजकारणावर विश्वास दाखवला. मतदारसंघातील विकास एवढाच मुद्दा न पाहता मतदारसंघातील शांततेला केंद्रबिंदू बनवून त्यांच्या पाठीशी राहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती असताना देखील अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले राजन तेली यांना नाम.नारायण राणेंसह अनेकांनी पाठिंबा दिला, खुद्द केसरकर यांचे जवळचे बबनराव साळगावकर त्यांच्या विरोधात मैदानात उतरले, परंतु नाम.केसरकरांना हरविण्याचे हरएक प्रयत्न होऊनही केसरकर आर्थिक पाठबळ नसताना तेव्हाही सर्वांना पुरून उरले. यावेळी तर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम पाठिंबा आहे आणि शिवसेना भाजपा युती होण्याचीच चिन्हे जास्त असल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना म्हणजेच नाम.केसरकर यांच्याच वाट्याला जाणार. त्यामुळे राजन तेली यांनी राज्यात शिवसेना भाजप गळ्यात गळे घालून बसली, विर सावरकर गौरव यात्रेत दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक अशोक दळवी, निता कविटकर वगैरे शिवसेना कार्यकर्ते एकत्र सामील झालेले असताना सावंतवाडीतील लोकांची दिशाभूल करण्यासाठी उठसूट आठवड्यात दोन दोन वेळा पत्रकार परिषद घेत केवळ विकासाच्या नावावर नाम.केसरकरांवर टीका करून राज्यातील शिवसेना भाजप युतीचे सरकार “विकास करण्यासाठी सक्षम नाहीत” असे राजन तेली दाखवतात की काय…? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. राजन तेली वारंवार घेत असलेल्या पत्रकार परिषदांमुळे ज्याप्रमाणे मुघलांना पाण्यात, अगदी झोपेत सुद्धा संताजी धनाजी दिसायचे त्याप्रमाणे तेलींना उठता बसता नाम.दीपक केसरकर दिसतात? असेच वाटतं आहे.
सावंतवाडी मतदार संघातून निवडून आलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री असलेले दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकास होत नसल्याची टीका वारंवार होत आहे. परंतु काही दिवसापूर्वी सावंतवाडी येथे पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरणाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी दीपक केसरकर हे विधानभवनात बोलत असताना वारंवार टीव्हीवर दिसत असतात, त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांच्याही ते अगदी जवळचे आहेत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातही दीपक केसरकर हे मोदींच्या जवळ दिसून आले होते हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे म्हटले होते. त्याचबरोबर दीपक केसरकर यांच्या एकंदरीत कार्याचा त्यांनी उल्लेखनीय असा उल्लेख केला होता. सावंतवाडी नगर परिषदेवर मागील अडीच वर्षे भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती, परंतु त्यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलेली अनेक आश्वासने आणि सावंतवाडीचा विकास आम्ही करून दाखवणार अशी घेतलेली शपथ, सावंतवाडीत कंटेनर थिएटर, भुयारी गटार, २४ तास पाणी अशी अनेक आश्वासने भारतीय जनता पक्षाकडून देऊन सावंतवाडीतील लोकांवर भुरळ घालण्यात आली होती. परंतु या आश्वासनांपैकी एकही आश्वासन अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या नेतृत्वाकडून पूर्ण करण्यात आलेले नसून त्या केवळ पोकळ घोषणा ठरल्या होत्या. नाम.दीपक केसरकर यांच्या बद्दल पत्रकार परिषद घेताना राजन तेली यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संजू परब व इतर माजी नगरसेवक सातत्याने असतात, परंतु त्यावेळी केवळ दीपक केसरकर यांच्या घोषणा दिसतात आणि आपण केलेल्या घोषणा मात्र दिसत नाहीत. हे म्हणजे असं झालं की “दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र दिसत नाही”.
नाम. दीपक केसरकर जर पुढील विधानसभेसाठी इच्छुक असतील तर नक्कीच ते शिवसेनेचे सावंतवाडीतील उमेदवार राहतील. त्यामुळे केसरकर हेच आपले सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी उमेदवार या भावनेतूनच राजन तेली आत्तापासूनच सावंतवाडीत येऊन आमदार दीपक केसरकर यांच्यावर तोंडसुख घेताना दिसून येत आहे. परंतु राज्यात शिवसेना व भाजपची युती असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा भाजप लढवणार हे कसं काय शक्य आहे..? एकीकडे भाजपमध्ये कुटुंबातील एकालाच उमेदवारी दिली जाते परंतु नारायण राणे यांच्या कुटुंबातून स्वतः नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, नितेश राणे देवगड मधील भाजपाचे आमदार आहेत, तर पुढील विधानसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा मतदार संघ म्हणजे कुडाळ मतदार संघ येथून माजी खासदार निलेश राणे हे येत्या विधानसभेसाठी जय्यत तयारी करत आहेत. निलेश राणे यांचे समर्थक माणगाव खोऱ्यातील युवा नेता विशाल परब यांनी कुडाळ मालवण मतदार संघाची उमेदवारी निलेश राणे यांनाच मिळणार या उद्देशाने कुडाळमध्ये भव्य दिव्य असे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. कुडाळ शहरात विशाल परब मोठमोठे कट आउट लावून निलेश राणे यांचे कॅम्पिंग करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागा या राणे कुटुंबाकडे गेल्या तर सावंतवाडीची जागा युतीचा धर्म म्हणून शिवसेनेकडे राहणार हे मात्र नक्कीच. त्यामुळे राजन तेली यांना भारतीय जनता पक्षाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळणे अवघडच दिसत आहे. तरीसुद्धा २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे राजन तेली सावंतवाडी मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार की काय? असा प्रश्न त्यांच्या पत्रकार परिषदांमुळे उपस्थित होत आहे. एकंदरीत सावंतवाडी मध्ये राजन तेली घेत असलेल्या पत्रकार परिषदा पाहता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ म्हणजे “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” अशीच परिस्थिती दिसून येत आहे.