सावंतवाडी
सरकारची दिवसेंदिवस बदलणारी आर्थिक धोरणं, खाजगीकरण यामुळे सगळ्याचं क्षेत्रात आज चिंतेचं वातावरण आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणारी आंदोलन आणि नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन वर होणारा खर्च हा जास्त आहे त्यामुळे भविष्यात आपल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल की नाही याबाबत साशंकता आहे म्हणूनच आपण सर्वांनी एकजुटीने संघटनेची ताकद वाढवली पाहिजे असे प्रतिपादन सेंट्रल गव्हर्नरमेंट पेन्शनर्स असोसिएशन सिंधुदुर्गचे संस्थापक व माजी जिल्हा सचिव श्री एम्. डी. जोशी यांनी केले. असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका स्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी येथे आज तालुका मेळावा संपन्न झाला. जोशी पुढे म्हणाले गेल्या दहा वर्षात पाचशेहून जास्त पेन्शनर्सना सरकारकडे प्रलंबित देयके मंजूर करून घेतली. जिल्ह्यातील विधवा व घटस्फोटित एकशे चाळीसहून जास्त महिलांना सुमारे साडेतीन कोटीहून जास्त थकबाकी व नियमित निवृत्तीवेतन सुरु करून दिले.
मेळाव्यात स्वागत व प्रास्ताविक असोसिएशनचे संघटनेमंञी अॅड नकुल पार्सेकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात श्री पार्सेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन काम संघटितपणे सुरु असून जिल्ह्यातील सर्व केंद्रीय सेवेतील निवृतीधारकांना त्याचा लाभ होत असल्याने संघटनेची आर्थिक ताकद सामुदायिक रित्या वाढवण्याचे आवाहन केले.
असोसिएशनचे अध्यक्ष श्री ए्.एस्.डिसोझा यांनी असोसिएशनचा वार्षिक आर्थिक अहवाल सादर केला. यावेळी ऐंशी वर्षे पुर्ण झालेल्या निवृत्तीधारकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी श्री अण्णा देसाई यांनीही आपले विचार मांडले.
मेळाव्याला सावंतवाडी तालुक्यातील पोस्ट, टेलीफोन, मायनिंग, हवामान खाते, रेल्वे इ. केद्र सरकारी सेवेतून निवृत्त झालेले दोनशेहून जास्त निवृत्तीधारक व फॅमिली पेन्शनर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन असोसिएशनचे जिल्हा सचिव श्री प्रमोद मोहिते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विश्वनाथ कुडतरकर, श्री पि. के. बागवे, श्री सुरेश पाटकर, श्री हडकर,श्री मसुरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
*(फोटो कॅप्शन- मेळाव्याला संबोधित करताना श्री एम् डी. जोशी, सोबत श्री देसाई, श्री लोबो व अॅड. नकुल पार्सेकर* )