कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “आवाज सिंधुदुर्ग” या पुरस्कार ऑल इंडिया रेडिओचे तसेच जिल्ह्यातील समालोचक विजय बागायतकर यांचा गौरव करण्यात आला. म्हापण येथील ओमसाई स्पोर्ट्स यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात मराठी, हिंदी, इंग्रजीतून क्रिकेट सामन्याचे समालोचन करणारे समालोचक घडत आहेत. त्यामुळे भविष्यात बाहेरून समालोचक आणण्याची गरज भासणार नाही, असे मत यावेळी बागायतकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ओमसाई स्पोर्टस म्हापण संघाचे मालक प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते पद्मश्री परशुराम गंगावणे यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी म्हापण उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर,शकील मुल्ला,सेवानिवृत्त बँक अधिकारी सुधीर ठाकूर,विजय बागायतकर यांचे वडील गणेश बागायतकर,गुरुनाथ ठाकूर, जगदीश म्हापणकर,रवींद्र नांदोस्कर,समालोचक राजा सामंत,रोहन कदम,समीर पांढरे,नाना नाईक,शाम वाककर, जय भोसले, अशोक नाईक,विकास गवंडे, प्रदीप देऊलकर, राजेश माळवदे,पुंडलिक तेंडोलकर,प्रणव ठाकूर,मयूर पिंगुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व समालोचक व्ही.व्ही.करमरकर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध पंच दिलीप सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी आपल्या अडचणीच्या काळात जिल्ह्यातील समालोचक, पंच,खेळाडू व रसिक प्रेक्षकांनी पाठीशी खंबीर राहून मनोबल वाढवल्याबद्दल श्री.बागायतकर यांनी आभार मानले.
प्रसिद्ध मराठी समालोचक समीर पांढरे यांनी मानपत्राचे वाचन केले.तसेच बागायतकर यांच्या समवेत केलेले समालोचन,क्रिकेटच्या मैदानावर आलेले अनुभव यांच्या स्मृती जागवत बागायतकर यांना पुढील इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
रेडिओ कॉमेंट्रेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक नाईक यांनीही गत स्मृतींना उजाळा दिला.यावेळी मालवणी समालोचक बादल चौधरी यांनी आपल्या जीवनप्रवासात बागायतकर यांचं समालोचन,तसेच शिकायला मिळालेल्या बाबींचा खास उल्लेख केला.यावेळी विजय बागायतकर यांना पुन्हा एकदा सर्वांसमोर आणण्याचा भीम पराक्रम करणाऱ्या अमोल जमदाडे यांनी बागायतकर व आपल्या भेटीचा प्रवास विशद केला.समालोचक जय भोसले, राजेश माळवदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले तर आभार प्रदीप देऊलकर यांनी मानले.दरवर्षी गुडी पाडव्याला ‘आवाज सिंधुदुर्गचा’ या पुरस्काराची घोषणा केली जाईल आणि दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जाईल अशी ग्वाही या कार्यक्रमाचे संकल्पक प्रवीण ठाकूर यांनी दिली.यावेळी मिलिंद केळुसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर जिल्ह्यात नव्वदीच्या काळात मुंबईतील मातब्बर खेळाडूंना सिंधुदुर्गातील विकास गवंडे इलेव्हन संघात खेळवणारे विकास गवंडे यांनी त्यावेळचे क्रिकेट आणि आताचे क्रिकेट याबाबतचे मत प्रकट केले.जिल्ह्यातील मातब्बर खेळाडूंना घेऊन जिल्ह्यातील एक चांगला संघ मोठ्या स्पर्धेत उतरावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तर मयूर पिंगुळकर यांनी समालोचक व पंच यांच्यासाठी विमा संरक्षणकवच याबाबत माहिती देत याचे सर्व हप्ते ओम स्पोर्ट्स म्हापण भरणार असल्याचे स्पष्ट केले.