You are currently viewing आठवडा बाजाराचे राजकारण नको, सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेऊ – पुंडलिक दळवी

आठवडा बाजाराचे राजकारण नको, सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेऊ – पुंडलिक दळवी

सावंतवाडी

आठवडा बाजारावरून सुरू झालेले राजकारण आता थांबवा, जनमत चाचणी घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या. चार ठिकाणी बाजार बसविण्यापेक्षा बाजारपेठेतील जागा योग्य आहे. त्यासाठी सर्वपक्षियांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेऊया, अशी हाक आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. दरम्यान या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी होणार असे सांगणाऱ्या दीपक केसरकर यांनी आपल्या काळात हॉस्पिटल उभारल्यास त्यांचा सावंतवाडीकरांच्यावतीने गांधी चौकात जाहीर सत्कार करू,असे ही त्यांनी सांगितले. श्री. दळवी यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले.

सावंतवाडी शहरात निवडणुकीच्या तोंडावर आठवडा बाजाराचे राजकारण सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला विचारात घेतल्याशिवाय प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे बाजार अन्यत्र हलविण्याच्या गोष्टी करत आहे. परंतु कोणताही निर्णय घेताना या ठिकाणी नागरीकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांना विश्वासात घेवून प्रश्न सोडवावा व योग्य ती जागा शोधून बाजार स्थलांतरित करावा.

दळवी पुढे म्हणाले, या ठिकाणी मंत्री दीपक केसरकारांकडून बाजार चार ठिकाणी हलविण्यात येणार आहे, असे जाहीर करण्यात आले. परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी चार ठिकाणी जाणे योग्य होणार नाही. तसेच त्या ठिकाणी जाणे त्यांना आर्थिक भूर्जंड सहन करावे लागणार आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेऊन पुढील भूमिका घ्यावी. त्यासाठी जनमत चाचणी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे दळवी म्हणाले. ते पुढे म्हणाले, दोन दिवसापूर्वी सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गोव्याचे आमदार जीत कार्लेकर यांनी गोव्याच्या सीमेवर तूये येथे सुविधा निर्माण करणारे गोवा-बांबुळीच्या धर्तीवर सुविधा देणारे हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचा फायदा येथील जिल्ह्यातील लोकांना होणार असल्याचे ते म्हणाले. परंतु जिल्ह्यातील लोकांना गोव्यात सुविधा देण्यापेक्षा या ठिकाणी जर सुविधा दिल्या गेल्या तर योग्य. मात्र त्यावेळी बाजूला बसलेल्या मंत्री केसरकर यांनी मान हलवून अप्रत्यक्षरीत्या त्याला अनुमोदन दिले. दुसरीकडे केसरकर यांनी सावंतवाडीत मल्टी स्पेशलिटीचा प्रश्न तात्काळ मार्गे लागेल अशी घोषणा केली. जर त्यांनी हा प्रश्न तात्काळ सोडवला तर आम्ही त्यांचा गांधी चौकात जाहीर नागरी सत्कार करून असे दळवी म्हणाले.

यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, अशोक पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा