सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी…!
कणकवली शहरातील वातावरण झाले भक्तिमय …!
कणकवली
राम जन्मला गं सखे राम जन्माला अशा जयघोषात श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रामजन्मसोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रामनवमीनिमित्त गेलेे काही दिवस मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे कणकवली शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. रामनवमीनिमित्त काशीविश्वेश्वर मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला. मंदिरातील रामप्रभूंच्या मूर्तीच्या ठीकाणी फुलांची आरस करण्यात आली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळापासून मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची रीघ लागली होती.
दुपारी ब्रह्मवृदाच्या उपस्थितीत प. पू. भालचंद्र महाराज संस्थांचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते बालराम मूर्तीची पूजा करून पाळण्यात घालण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वा. राम जन्मोत्सव पार पडला. यावेळी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशी पाळणे गिते व भक्तीगीते म्हटली. यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष अँड.प्रवीण पारकर, विश्वस्त शशिकांत कसालकर,गणेश उर्फ बंडू हर्णे,विजय केळुसकर,सुभाष गोवेकर,अनिकेत उचले यांच्यासह मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.तद्नंतर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.दरम्यान हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविक भक्तांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी राणे बुवांचे कीर्तन देखील पार पडले.कणकवली शहरातील काशिविश्वेश्वर मंदिरासह तालुक्यातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव साेहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला.