फोंडाघाट
जग रहाटी किती पुढे गेली असली तरी, ग्रामीण भागातील भाविकांची-ग्रामस्थांची पावले सर्वप्रथम आजवर चालत आलेल्या पारंपारिक आध्यात्मिक वाटेवर आपसूक पडताना दिसतात. त्याचीच प्रचिती फोंडाघाट- मारुतीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात “रामनवमी जन्मोत्सव” उदंड उत्साहात, अबालवृद्ध महिला पुरुषांच्या साक्षीने संपन्न झाला.
विद्युत रोषणाई,डिजिटल बॅनर आणि फुलांच्या सजावटीने सजलेल्या मंदिराची पहाट रामप्रहराच्या भक्तीगीतांनी अधिक प्रसन्न झाली. वाडी- वाडीवरील भाविकांची मांदियाळी मंदिराकडे येत होती. फुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये श्रीरामाची प्रतिमात्मक प्रतिमा विराजमान झाली होती. आजवर सेवा केलेल्या मुणगेकर कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली, फोंडाघाट वारकरी मंडळींनी वारकरी भजनाचा सहज-सुंदर अनुभव देताना, ठीक बारा वाजता राम नामाचा जयघोष केला आणि उपस्थित भाविकांनी गुलाब- चाफ्याच्या उधळणीने राम जन्म अनुभवला. सुंठवडा- खोबरे यांचा प्रसाद आणि राम नामाचा उच्चार यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. पुरोहित भाई हिरलेकर यांनी प्रतिमात्मक रामाला न्हाऊ घालून जोजवलं. महिलांनी पाळणा म्हटला आणि रामनामाच्या उद्घोषात मंदिर परिसर, ढोल ताशांच्या गजरात दुमदुमून गेला. यावेळी नंतर राम- हनुमान भेटीचा सोहळा मिरवणुकीसह संपन्न झाला. भाविक मोठ्या श्रद्धेने,आनंदाने आणि भक्तीभावांने या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. चालू वर्षी युवा-युवतींचा वावर लक्षणीय होता.जुने जाणते व्यापारी- ग्रामस्थ- वारकरी संप्रदाय यावेळी आवर्जून उपस्थित उपस्थित होते.