सावंतवाडी :
रामोत्सवानिमित्त सावंतवाडी येथे विश्व हिंदू परिषद देणे रामोत्सव २०२३ चे प्रथमच आयोजन केले असून गुरुवार दिनांक ३०/३/२०२३ रोजी सकल हिंदू संस्थांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
गुरुवारी रामनवमी दिवशी सकाळी प्रथेप्रमाणे १२.०० वाजता श्री देव नारायण मंदिर येथे राम जन्मोत्सव नियोजित केला आहे. त्याचप्रमाणे दुपारी ४.०० वाजता सावंतवाडी शहर व आजूबाजूच्या परिसरातील हिंदू बांधव व संस्थांनी शोभायात्रा आयोजित केली असून ही शोभायात्रा श्री देवनारायण मंदिर सावंतवाडी येथून सुरू होणार असून मुख्य रस्त्याने नगरपालिका मार्गे रामेश्वर प्लाझा मिलाग्रिस हायस्कूल चौक, जयप्रकाश चौक, गांधी चौक, उभा बाजार, चितारआळी मार्गे पुन्हा श्री देव नारायण मंदिर येथे येणार आहे. या शोभा यात्रेमध्ये ढोल पथक, वारकरी मंडळी, शाळेतील मुलांचे लेझीम पथक, विविध हिंदू संस्थांची पथके, चित्ररथ, रामायणातील सचित्र सजीव पात्रे, असे घटक समाविष्ट होतील. रामाची पालखी/रथ, मुलांचे विविध कार्यक्रम इत्यादी शोभायात्रेची शोभा असतील. शोभायात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी भाविकांना दर्शन व पूजेची सोय करण्यात आलेली आहे.
श्री देव नारायण मंदिर येथील स्टेजवर शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर गीतरामायण व “भक्ती प्राबल्य” हे श्रीरामावर आधारित श्रीदेवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, डोंगरपाल आयोजित दशावतारी नाटक होणार असून अशा विविध कार्यक्रमाने श्रीराम नवमी साजरी करण्याचा हिंदू संघटनांचा मानस आहे. परिसरात भगवा लावून संपूर्ण परिसर भगवामय करण्यात येईल. श्रीरामोत्सव कार्यक्रम हा आपलाच कार्यक्रम समजून सर्वांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये कार्यक्रमात व शोभायात्रेत समाविष्ट व्हावे व श्रीरामोत्सव कार्यक्रम यशस्वी करावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.