मालवण / आचरा :
संस्थानी थाटाकरीता प्रसिद्ध असणाऱ्या आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी शाही थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे सर्व मानकरी, देवसेवक, नोकर-चाकर, महालदार, विश्वस्त मंडळ हा उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर येथील श्री रामेश्वर भक्तगण आचरे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गुढीपाडव्यापासूनच रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. गुढीपाडवा ते लळीतापर्यंत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रघुपती मुर्तीची पूजा, रोज दुपारी रघुपतीची आरती, सायंकाळी दरबारी प्रख्यात गायकांचा गायनाचा कार्यक्रम व रात्री उशिरा शाही लवाजम्यासह पालखी मिरवणूक सोहळा व कीर्तन होणार आहे.
विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी
गुरुवार दिनांक 30 रोजी रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे किर्तन श्री. मिलंदबुवा कुळकर्णी करणार असून सायं. ०५:३० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे.
शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे)यांचे गायन,
शनिवार दि. ०१ एप्रिल रोजी रात्री ०९:३० वा. विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आचरा यांचा कार्यक्रम ‘आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग ‘ हा कार्यक्रम होणार असून कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे,विजय कदम यांचा सहभाग असणार आहे.
बुधवार दि. ०५ रोजी रात्री ११:०० वा. हनुमान जयंती निमित्त श्री. रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसो चांगलो’ होणार आहे.
गुरुवार दि. ०६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्माचे किर्तन बुवा श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत.
या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.