You are currently viewing कणकवलीत ५ एप्रिलला ‘‘वीर सावरकर गौरव यात्रा’’ निघणार – नीतेश राणे 

कणकवलीत ५ एप्रिलला ‘‘वीर सावरकर गौरव यात्रा’’ निघणार – नीतेश राणे 

कणकवली

शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत भव्य ‘‘वीर सावरकर गौरव यात्रा’’ निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवं वादळ निर्माण केलं जाणार असल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. सावरकर यांच्यावर सातत्‍याने टीका करणाऱ्या राहूल गांधी यांना अडविण्याची हिंमत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहूल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्‍यांची नौटंकी आहे अशी टीकाही त्‍यांनी केली.

येथील प्रहार भवनमधील सभागृहात श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीर सावरकर गौरव यात्रेची माहिती दिली. त्‍यांच्यासोबत शिवसेनाप्रमुख संजय आंग्रे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.

श्री.राणे म्‍हणाले, राहूल गांधी, नाना पाटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्‍याने अपमान करत आहेत. त्‍यांना योग्‍य तो संदेश देण्यासाठी आम्‍ही ५ एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. यात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्‍याचबरोबर हिंदुत्‍ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आमचे आवाहन आहे.

राणे म्‍हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच वीर सावरकर यांच्याबद्दल आदर बाळगला. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मनीशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलनही बाळासाहेब ठाकरे यांनी छेडले होते. मात्र त्‍यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांनी शांत राहणे पसंत केले. ते मुख्यमंत्री असताना राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वारंवार टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांना अडविण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहूल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे ढोंगीपणा आहे.

दरम्‍यान कणकवलीतील वीर सावरकर गौरव यात्रा भव्यदिव्य असणार आहे. या यात्रेमध्ये सावरकर यांचा रथ असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्‍या भाषणांची चित्रफित दाखवली जाणार आहे असे श्री.राणे म्‍हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा