पुणे
पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते.
खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीष बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
गिरीष बापट यांची राजकिय कारकिर्द
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली अन् पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.
यानंतर 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.