You are currently viewing ठेकेदाराकडून कमिशन घेणाऱ्या आमदार व त्याच्या कुटुंबीयांकडूनच जिल्हा विकासाला खीळ

ठेकेदाराकडून कमिशन घेणाऱ्या आमदार व त्याच्या कुटुंबीयांकडूनच जिल्हा विकासाला खीळ

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा प्रथमच आम. नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली जवळपास २५ ते ३० वर्षे नाम.नारायण राणे यांचे कुटुंबीय म्हणजे दरारा अशीच ओळख आहे. नारायण राणे यांच्या पाठोपाठ आम. नितेश राणे यांनी आपल्या कार्यशैलीतून आपली एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली आणि आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात विकासात्मक कामे करून जनतेसाठी झटणारा आमदार अशी ख्याती मिळवली. गेले काही दिवस वैभववाडी येथील शिवसेनेचे नेते अतुल रावराणे आणि आम.नितेश राणे यांच्यात मीडिया मधून खडाजंगी पाहायला मिळत आहे. एकमेकांवर होणाऱ्या टीकेमधून एक दुसऱ्याची उणेदुणे काढण्याचा प्रकार पाहिला असता खरोखरच लोकशाहीत लोकप्रतिनिधी नक्कीच जनतेसाठीच काम करतात का..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्पन्न होत आहे.
आम.नितेश राणे यांनी अतुल रावराणे यांच्यावर खरमरीत टीका करताना असे म्हटले होते की, “आम्ही उद्योजक आहोत, कमिशन एजंट नाहीत. तुम्ही जे समाजकार्य करता त्याची दखल तुमचा पक्ष तरी घेतो का..? आपण आपल्या पक्षात प्रथमतः आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करा आणि मगच आमच्यावर टीका करा”.
आ.नितेश राणे यांनी अतुल रावराणे यांच्यावर अनेक आरोप करून ठाकरे सरकारच्या काळात देवगड वैभववाडी कणकवली मतदार संघातील आपण सुचविलेली कामे रद्द करून मतदारसंघावर अन्याय केल्याचे म्हटले होते.
आमदार नितेश राणे यांच्या टीकेमुळे शिवसेना नेते अतुल रावराणे संतप्त झाले आणि त्यांनी आ. नितेश राणे यांच्यासहित नारायण राणे यांच्या कुटुंबाचे वाभाडेच काढले. “आम्ही रावराणे घरंदाज आहोत, राणे कुटुंबीय स्वतःची प्रॉपर्टी वाचविण्यासाठी भाजपमध्ये गेले, स्वतःचं आत्मपरीक्षण करा… सध्या भाजपमध्ये तुमचं अस्तित्वच काय…? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोटांगण घालावे लागते आहे… नाम.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे”. मी तोंड उघडले तर सर्वच बाहेर काढेन असा इशारा त्यानी आम. नितेश राणे यांना दिला. एवढ्यावरच न थांबता शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी नारायण राणे यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी कमावलेल्या मालमत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितेश राणे यांनी माझ्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे असे म्हटले. आयकर विभागात साध्या नोकरीला असणाऱ्या आमदाराच्या वडिलांनी दीडशे कंपन्या कशा काय स्थापन केल्या..? या संपत्ती कमावण्याचे गमक काय..? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझा व्यवसाय हा माझ्या मनगटातील ताकतीवर उभा आहे. कोणत्याही ठेकेदाराकडून किंवा कामात कमिशन घेऊन मी व्यवसाय उभे केले नाहीत, याउलट आमदार व आमदाराच्या कुटुंबीयांनी ठेकेदारांकडून कमिशन घेऊन जिल्हा विकासाला खीळ बसवली आहे. असा अतुल रावराणे यांनी आरोपच केला.
अतुल राव राणे यांनी पुढे बोलताना असे सांगितले की, फोंडाघाट येथील एका ठेकेदाराकडून पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामात पाच टक्के कमिशन स्थानिक आमदाराने मागितले होते. हे केवळ एक उदाहरण असून अशी कितीतरी उदाहरणे आहेत आणि गेल्या दहा वर्षांचा संपूर्ण लेखाजोखा माझ्याकडे आहे. देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघासाठी आपण स्वतः दोन हजार कोटींचा निधी आणल्याचे स्थानिक आमदार सांगत आहेत परंतु निधी आणण्याचे कर्तृत्व आणि ताकद यांच्यात नसून मान. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी निधी आणला आणि त्या निधीतून होणाऱ्या कामांवरचे लोणी खाण्याचे काम मात्र हे स्थानिक आमदार करत आहेत. असा आरोप अतुल रावराणे यांनी केला. देवगड तालुक्यातील फणसे, पडवणे येथील आंबा बागांना लागलेल्या आगीमुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून महावितरणला सदर नुकसानी बाबतची माहिती दिली व तलाठ्यांकडून पंचनामे करून घेत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी हे स्थानिक आमदार आपण निधी आणल्याचे सांगत भूमिपूजन करून कमिशन रुपी लोणी खाण्यात व्यस्त होते. त्यावेळी तेथील शेतकऱ्यांनी आ.नितेश राणे यांना जाब विचारल्यामुळे आपण केलेला दौरा त्यांना झोंबला म्हणून ते आपल्यावर टीका करत आहेत. असेही अतुल रावराणे म्हणाले.
माझी लायकी काढताना स्वतःची आणि कुटुंबाची पात्रता काय हे त्यांनी ओळखावे. आंगणेवाडी येथील आनंद मेळाव्यात भाजपने या आमदार कुटुंबीयांची लायकी त्यांना दाखवून दिली आहे. हे आमदार ज्या पक्षात जातील त्या पक्षाचं यांनी वाटोळच केला आहे. एवढेच नव्हे तर स्वतःचा काढलेला पक्ष देखील सहा महिन्यात ज्यांना गुंडाळावा लागला त्यांनी मला अक्कल शिकवू नये. शिवसेना पक्ष हा पक्षाच्या घटनेनुसार चालतो त्यांच्याकडे जी जी जबाबदारी दिली जाते ती अचूकपणे पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो. माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिलेली असून पक्ष संघटना वाढविणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हे माझे कर्तव्य असून ते मी अचूकपणे पार पाडत आहे. मी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये देखील काम केले असून आजही भाजपमध्ये मला मानसन्मानाने बोलावले जाते. परंतु या आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणीही बोलावत नाही कारण दुसऱ्याच्या दहा पिढ्यांचा उद्धार करणे आणि वापर करून फेकून देणे ही यांची वृत्ती… त्यामुळे या आमदार व त्यांच्या कुटुंबीयांना आता किंमतच उरली नसल्याचे सांगून अतुल रावराणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
गेली अनेक वर्षे जिल्ह्यात नारायण राणे यांचा दरारा असल्याचे जिल्हावासीय पाहतच आहेत. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धती देखील नारायण राणे यांच्यासारखीच धडाकेबाज असल्यामुळे त्यांनी देखील जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे आजपर्यंत त्यांच्यावर सडेतोड असे कोणीही आरोप केले नव्हते. परंतु आरोप प्रत्यारोपाच्या या फैरीत आ.नितेश राणे यांनी शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्यावर आरोप केल्यानंतर अतुल रावराणे यांनी देखील आ.नितेश राणे यांना “ईट का जवाब पत्थर से” अशा प्रकारचे उत्तर दिले आहे. त्यामुळे भविष्यात देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघात शिवसेना नेते अतुल रावराणे आणि भाजपाचे आ.नितेश राणे यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा