मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करणार ; शिवसेना नेते ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती
मालवण
मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. हा किल्ला मालवण नगरपालिकेच्या ताब्यात आल्यास नगरविकास खात्याच्या माध्यमातून किल्ल्याच्या दुरुस्तीला भरीव निधी मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला मालवण नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेना नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. किल्ल्याच्या विकासासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान मालवण पालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाला असून योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुका संघटक भारती घारकर, विभाग संघटक मयुरी घाडीगावकर, तालुका संघटक रिया आचरेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, पराग खोत, शबनम शेख, लुड्डीन फर्नांडिस, राजा तोंडवळकर, व्ही. डी. सामंत, मारुती थोरवंशी आदी उपस्थित होते. ब्रिगेडियर सावंत म्हणाले, किल्ले सिंधुदुर्ग हा पर्यटकांचे खास आकर्षण असून लाखो पर्यटक दरवर्षी या किल्ल्याला भेट देत दर्शन घेतात. पर्यटनाच्या माध्यमातून या किल्ल्याचा विकास, देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा किल्ला मालवण पालिकेच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे.
मालवण शहर हे पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. किनारपट्टीवर अस्वच्छता असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे मालवण शहर स्वच्छ बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर येत्या काळात भर दिला जाणार आहे. पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र बैठकीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात कचऱ्याची विल्हेवाट योग्यरितीने होत नसल्याने कचरा डंपिंगसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी तसेच शहरा लगतच्या खाडीपात्रातील गाळ काढून त्यात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पर्यटकांसाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.