*श्री.विजय देसाई…*
*……खडतर प्रवासातून उदयास आलेला आदर्श पत्रकार…!*
पूर्वीच्या सावंतवाडी व नव्याने झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील तळकट या निसर्गरम्य अशा छोट्याशा गावातून स्वप्नांचा पाठलाग करत सावंतवाडी शहराकडे आलेल्या विजय देसाई यांनी पत्रकारितेत अनमोल असे कार्य करत आतापर्यंत सावंतवाडी पत्रकार संघाचा मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार आणि महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पत्रकार असे मनाचे पुरस्कार मिळवून पत्रकारितेत आपल्या लिखाणाचा वेगळा ठसा उमटविला आहे. परवाच झालेल्या सावंतवाडीच्या पत्रकार पुरस्कार समारंभात देखील पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्यासाठी आदरणीय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तळकट सारख्या छोट्याशा गावातून प्राथमिक, कोलझर येथून माध्यमिक शिक्षण आणि बांदा येथील खेमराज मेमोरियल मधून उच्च माध्यमिक शिक्षण घेत सावंतवाडीच्या श्री.पंचम खेमराज महाविद्यालयातून पदवी घेतलेले विजय देसाई यांनी १९९३ पासून दैनिक सकाळ मधून पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारिता करत असतानाच कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारितेमध्ये पदवी घेणारे त्यावेळी ते पहिलेच विद्यार्थी होते. १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी दैं.सकाळ सावंतवाडी कार्यालयात पत्रकारिता केली. त्यानंतर २००५ पासून जिल्ह्यातील अग्रणीय दैनिक असलेल्या तरुण भारत मध्ये त्यांनी पत्रकारितेची दुसरी इनिंग सुरू केली ती आजपर्यंत नाबाद सुरू आहे.
आजपर्यंत त्यांनी तरुण भारत सावंतवाडी तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीत एक प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रात पत्रकारितेतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. धराग्रस्तांचे प्रश्न असो वा सामाजिक प्रश्न त्यांनी हिरहिरिने मांडले आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग भागात होणाऱ्या मायनिंग बाबत त्यांनी अनेकदा जनजागृती पर लिखाण करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. पर्यावरण विषयक मुबलक लिखाण केले असून डॉ.माधव गाडगीळ अहवाल, कस्तुरीरंगन समिती अहवालावर देखील विस्तृत लेखन केले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. आपल्या पत्रकारितेतील कार्यातून पत्रकाराने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, पत्रकार म्हणून निःपक्षपाती लेखन केलं पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. विजय देसाई हे याच पठडीतील प्रामाणिक पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यासाठी आणि भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा…!