You are currently viewing केसरी येथे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

केसरी येथे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

शतप्रतिशत भाजपसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना आवाहन

 

सावंतवाडी :

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे त्यांच्या निवासस्थानी केसरी परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित केले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ द्वारे हितगुज साधले. यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी व जनतेशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस बंटी पुरोहित, राजन वराडकर, माजी पं. सं . सदस्य संदीप गावडे यांच्यासह लोक प्रतिनिधी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘सबका साथ सबका विकास’ या विचाराला प्रत्येक घराघरात पोहोचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. २०१४ नंतर भारताला सर्वांगीणदृष्ट्या सशक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अभिनव अशा अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आणल्या. आज मोदीजींच्या नेतृत्वात भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठीच प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक घरात त्यांचे विचार पोहोचवावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदत जमा करण्यात येत आहे. उज्वला गॅस योजनेच्या धारक महिलांना सबसिडी देण्यात येत आहे. यापुढेही केंद्रातून येणारा प्रत्येक रुपया हा प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात थेट जमा होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने यासाठी मोदीजींच्या या विकास कार्यात समर्थपणे हातभार लावणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी तर आपली जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे. आपल्याला जनतेने निवडून दिले याचा अर्थ जनतेचा आपल्या कार्यक्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. यासाठीच आपली निवड सार्थ कशी असावी याबाबतीत प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. आपण काम करीत असलेल्या प्रत्येक वाडीवस्तीतील प्रत्येक घराघरात नेमकी काय परिस्थिती आहे याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्याचा डेटा उपलब्ध करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार कसा निर्माण करता येईल यावर शासन स्तरावरून जे – जे शक्य असेल ते करण्याचा माझा मानस आहे. मात्र यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी योग्य माहितीचे संकलन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना घराघरात पोहोचवून भारतीय जनता पार्टीचे विचार जनतेच्या मनात रुजू द्या. लोकप्रतिनिधी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी कामाला लागा. आगामी सर्व निवडणुकांमध्ये ग्रामपंचायती पासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत फक्त भाजपचाच विजय होईल यासाठी प्रयत्न करा. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका तसेच विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवारच निवडून येऊन शत प्रतिशत भाजप होण्याच्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा