मालवण
शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात आज मत्स्य रुपी विष्णू देवाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पारंपरिक मच्छीमार व श्रीकृष्ण मंदिर अध्यक्ष दत्ता केळुसकर यांनी मत्स्य रुपी विष्णू प्रतिमेचे पूजन केले. मत्स्य व्यवसाय समोर असलेली आव्हाने व विघ्ने दूर करून सागर साधन संपत्तीचा शाश्वत वापर करण्याची सुबुद्धी मनुष्यास द्यावी असे साकडे मत्स्यरूपी विष्णू देवाला घालण्यात आले.
हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः मच्छिमार भगवान विष्णूच्या या मत्स्य स्वरुपाची पूजा अपार भक्ती आणि समर्पनाने करतात. देशभरातील भगवान विष्णू मंदिरात हा सण भव्य पद्धतीने साजरा करतात.
गाबित समाज, श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा -मालवण व सागरी सुरक्षा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या मत्स्य जयंती कार्यक्रमास गाबीत समाज सिंधुदुर्गच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला व मत्स्य जयंती साजरी केली. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज संघाचे अध्यक्ष जीजी उपरकर, सिंधुदुर्ग गाबित जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेश परब, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, सेजल परब, मेघा गावकर, चारू आचरेकर, किरण कुबल, संजय बांदकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, स्वाती कुबल, आनंद जामसंडेकर, दीपक तारी, ॲड. संदीप चांदेकर उपस्थित होते.
मत्स्य जयंती कार्यक्रम करण्यासाठी वसंत गावकर, श्री. पणशीकर, भाऊ सामंत, विलास हडकर व धुरीवाडा ग्रामस्थांनी सहकार्य केले. भविष्यात सिंधुदुर्गातील प्रत्येक मच्छिमार गावामध्ये मत्स्य जयंती साजरी करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.