बांदा :
उड्डाणपूलासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उड्डाणपूलाला विरोध नसून महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे समान जमीन संपादित करावी. आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढु अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी येत्या आठ दिवसात भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी व गाळेधारक यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री कांबळे यांनी यावेळी देत अतिक्रमणाची कारवाई तात्पुरती स्थगित केली.
आज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री कांबळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारवाई करण्यासाठी आले होते. यावेळी अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी देखील मागवण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान, गाळेधारक हेमंत दाभोलकर यांच्यासह स्थानिकांनी अभियंता कांबळे यांना घेरावा घालत नियमानुसार सीमांकन करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळता थेट कारवाई पथक आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.