कोरोनाच्या महामारीपासून मुंबईत राहिलेले माजी पालकमंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीत दाखल झाले आणि संध्याकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्याबाबत उठणाऱ्या अफवा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांनी उघडलेल्या टीकेच्या मोहिमेचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करायची लायकी नव्हती अशा माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं. त्याच माणसाने शिवसेनेवर, उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे म्हणजे उंदराने राजा समोर ढोलकी वाजवायची, माझी टोपी दिली नाही म्हणून या शालेय पुस्तकातील गोष्टीसारखेच आहे. म्हणजे टोपी दिली तर राजा घाबरला आणि नाही दिली म्हणजे राजा भिकारी. आपण लढाईला उतरतो तेव्हा पूर्ण तयारीनिशी उतरतो मग ती कोणतीही अपप्रवृत्ती असो. मी कोकणसाठी लढणार मग समोर कोणीही असो. मोठे झाड तुटले तरी छोटी छोटी झाडे असतात, अशा अनिष्ठ प्रवृत्ती विरुद्ध आपण लढणार. आपण मंत्री असताना अशांना पोलीस कस्टडीमध्ये बसविले होते अशीही त्यांनी पुष्टी केली.
पंतप्रधान ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला बोलावले होते, नारायण राणे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यात सुधारणा नाही. आपला लढा हा अपप्रवृत्ती विरुद्ध होता. शरद पवार यांच्यावर सुद्धा आपले प्रेम होते आणि आहे. फडणवीस यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपण भाजपात जाणार म्हणून अफवा पसरवल्या. उद्धव ठाकरे यांचे देखील आपल्यावर प्रेम आहे. मंत्रिपद गेल्यामुळे आपण नाराज नसून सिंधुदुर्गचे मंत्रिपद गेल्याचे दुःख आहे. वैभव नाईक मंत्री झाले असते तरी चालले असते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आपण समाधानी असल्याचे सांगून शिवसेना पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसून आपण सतत पक्ष बद्दलणाऱ्यातला नसल्याचे सांगितले.
आपण मंत्री असताना कोण हात ओढायचा, कोण शर्ट ओढायचा एवढी गर्दी असायची. आपण सर्वसामान्य लोकांपासून मंत्री असतानाही अंतर राखले नाही. परंतु कोरोनाच्या काळात आपण मुंबईत राहिलो ते कोविड मुळे सुरक्षा म्हणून. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये हा त्यातील उद्देश. मुंबईत राहण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण मंत्री असताना कोकणासाठी आणलेला निधी पुन्हा मिळवायचा होता. जे प्रकल्प आणले ते सुरू करायचे होते. आणि जोपर्यंत कोकणचा निधी, प्रकल्प सुरळीत होत नाहीत तोपर्यंत मुंबईत राहण्याचे आपण ठरविले होते. आपण दिलेल्या कोट्यवधींच्या निधीतूनच आता कामे सुरू होताहेत. मुंबईत राहून शासकीय मेडिकल कॉलेज, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादींसाठी प्रयत्न केला आणि मंजूर करून घेतले. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेळ देणार आहे. आपल्याकडे नव्यानेच घटनात्मक जबाबदारी दिली आहे. त्याचीही त्यांनी माहिती दिली. कोकण प्रदेश हा विचारवंतांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. सर्व मंत्र्यांचे देखील कोकणावर विशेष लक्ष आहे. पर्यटनाचा आपल्याला तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात क्रांती करणार. आपला युनिक प्रस्ताव सांगताना त्यांनी बांदा ही व्यापारीपेठ होती, तिथे गलबते यायची. बांदा पासून आरोन्दा खाडी जोडली गेली पाहिजे. तरच पर्यटन विकास होऊ शकेल. पर्यटन हा आपला आवडीचा विषय असल्याचे सांगताना शिर्शिंगे व विर्डी धरण देखील पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
कोकणासाठी काय मिळते? हजारो कोटी इतरत्र जातात, त्यामुळे अजित पवार यांच्यावर मात्र आपण नाराज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. कोकणचा विकास, सिंधुदुर्गचा विकास हाच आपला विकास. त्यामुळे तीन वर्षे जरी मंत्रिपद मिळाले असते तरी सर्व प्रकल्प पूर्ण केले असते आणि दोन वर्षांसाठी मंत्रिपद वैभव यांना दिले असते असेही त्यांनी बोलून दाखवले.
सावंतवाडीत सत्ताधाऱ्यांकडून व्यापारी बांधवांवर होणाऱ्या अन्यायावर बोलताना त्यांनी व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगून नगरपलिकेतील घडामोडींवर आपला लक्ष असून पालिकेची प्रॉपर्टी विकू देणार नाही हे आवर्जून सांगितले. एकूणच केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत कोणावर फक्त आगपाखड करण्यात धन्यता न मानता जिल्ह्याप्रति आपली असलेली आस्था प्रेम उघड केलं. मंत्रिपद गेल्यावरही पक्षावर असलेली निष्ठा, आणि पक्षाप्रमुखांबद्दल आपले प्रेम दाखवून दिले. शरद पवारांवरचे प्रेम आणि अजित पवारांबद्दलची नाराजी देखील उघड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न उराशी असल्याचे दाखवून देतानाच, सावंतवाडीचा विकास सुद्धा करण्याची हमी दिली. अपप्रवृत्ती विरोधात आजही ठामपणे उभे राहण्याची धमक देखील दाखवून दिली. त्यामुळे केसरकर यांची पत्रकार परिषद अनेक प्रश्नांची उत्तरे देत संपली.