You are currently viewing *शेवटच्या साखळी सामन्यातही आरसीबीचा पराभव

*शेवटच्या साखळी सामन्यातही आरसीबीचा पराभव

*शेवटच्या साखळी सामन्यातही आरसीबीचा पराभव*

*मुंबई इंडियन्सने चार गडी राखून केले पराभूत*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांना दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. त्यांना यूपी वॉरियर्सविरुद्ध खेळायचे आहे. दिल्लीने पुढचा सामना जिंकल्यास उत्तम धावगती असलेला संघ अव्वल स्थानावर असेल.

स्मृती मंधानाच्या आरसीबीला महिला प्रीमियर लीगमधील विजयासह त्यांची मोहीम संपवता आली नाही. त्यांना त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीला २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा करता आल्या. मधल्या षटकांमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला, पण १६.३ षटकांत ६ बाद १२९ अशी मजल त्यांनी मारली.

या सामन्यातील विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानी पोहोचला असला तरी थेट अंतिम फेरीत पोहोचणार की नाही, हे दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्याने ठरणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सोफी डिवाइन (०) पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया केरने बंगळुरूला तीन धक्के दिले. तिने प्रथम कर्णधार स्मृती मंधानाला यास्तिका भाटियाकरवी झेलबाद केले. मंधाना २४ धावा करू शकली. यानंतर हीथर नाइटला वोंगने झेलबाद केले. तिला १२ धावा करता आल्या. कनिका आहूजाला अमेलियाने यष्टिरक्षक यास्तिकाच्या हातून त्रिफळाचीत केले. कनिकाला १२धावा करता आल्या. नताली सीवर ब्रंटने एलीस पेरीला पायचीत टिपले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून तंबूमध्ये परतली. तिलाही नताली सीवर ब्रंटने त्रिफळाचीत केले. मेगन शुटला साइका इशाकने पायचीत केले. तिला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी इस्सी वोंगने २० व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कसात यांना बाद केले. ऋचा १३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ धावा करून बाद झाली. त्याचवेळी दिशाला दोन धावा करता आल्या.

सलामीवीर हिली मैथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. यास्तिका ३० आणि मैथ्यूज २४ धावांवर बाद झाले. त्या दोघी बाद झाल्यानंतर संघाला सतत धक्का बसला. नताली सीवर ब्रंट १३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावा करून तंबूमध्ये परतल्या. इथून सामना फिरेल असे वाटत होते, पण अमेलिया केर आणि पूजा वस्त्राकर यांनी तसे होऊ दिले नाही. पूजा १८ चेंडूत १९ धावा करून बाद झाली, मात्र तोपर्यंत तिने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. इस्सी वोंग खाते उघडू शकली नाही. अमेलिया केरने २७ चेंडूत नाबाद ३१ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला. आरसीबीकडून मेगन शुट, श्रेयंका पाटिल, एलिस पेरी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अमेलिया केरने फलंदाजी करताना नाबाद ३१ धावा केल्य़ा तर गोलंदाजी करताना २२ धावांमध्ये ३ विकेट घेतल्या. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा