You are currently viewing राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार ठरले लक्षवेधी

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण;कणकवली बाजारपेठेत लुटला आनंद

कणकवली

खो…खो…खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा…, सण हा होळीचा…, खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
कणकवली बाजारपेठेतील शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळ आयोजित केलेली राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा कणकवलीकरांसाठी यागदार ठरली.
राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य दिव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले. समर्पक
संगीत साथीवर एकापेक्षा एक सरस गौळण व भारूडांवर या सर्वच कलाकारांनी बेभान होऊन ताल-सुराच्या ठेक्यावर नाचत कलाविष्कराचे अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बाजरपेठ, झेंडा चौकातील मांड उत्सवात हलत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्करांचा सोहळा नेत्रदीपक असाच ठरला.
अन् उत्तरोतर सोंगांचा कार्यक्रम रंगतदार झाला.
राधाकृष्णनृत्य रोंबाट स्पर्धेत गावडोबा माडाचीवाडी या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्‍वर ब्राह्मणसाईचीवाडी -राईवाडी या संघाने द्वितीय तर गांगेश्‍वर मंडळ माडाचीवाडी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. गणेश कृपा मित्रमंडळ तेंडोली-तळेवाडी व आईभवानी हूमरमळा वालावल या संघांनी उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त केले. पोपट, गरूड, मोर, बदक, बगळा या पक्ष्यांसह वाघ व ड्रॉगन प्राण्यांची वेशभूषेने उपस्थितांची
मने जिंकली. राधानृत्य, पौरणिक देखावे, एकापेक्षा एक ट्रिकनीसयुक्त चित्ररथ देखावे सोबत पारंपरिक वेशभूषेचा साज लक्षवेधी ठरला. या स्पर्धेत जिल्ह्यातून 8 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे व ज्येष्ठ अभिनेते श्याम नाडकर्णी यांनी केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. यात विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप पारकर राजन पारकर, मंदार सापळे,राजू मानकर, राजेश सापळे,नीलेश धडाम, काशिनाथ कसालकर,शशिकांत कसालकर,उदय मुंज,बाळा सापळे,हरिष उचले,तेजस राणे, प्रसन्ना देसाई,चेतन अंधारी,दिनेश नार्वेकर,हर्षल अंधारी, प्रद्युम मुंज, बाळा तिरोडकर,आनंद पोरे,रुपेश खाडये मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

महापुरुष मित्रमंडळ हास्य कल्लोळ व राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा आयोजित करून कोकणातील लोककलेचे वैभव जपण्याचे काम करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या मंडळाचे विविध उपक्रम हे स्तुत्य असतात. या स्पर्धांतून ग्रामीण भागातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून हे कलाकार कलाविष्कार सादर करून शहरावासीयांना ग्रामीण संस्कृतीचे महत्व समजून सांगत आहेत. आपल्या रुंढी व परंपरांची जोपासना देखील ग्रामीण भागातील कलाकार करीत आहे,याला व्यासपीठ मिळून देण्याचे काम महापुरूष मित्रमंडळ करीत आहे. ही बाब अभिनास्पद आहे, असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा