You are currently viewing महिला प्रीमियर लीगमध्ये तीन प्लेऑफ संघ ठरले

महिला प्रीमियर लीगमध्ये तीन प्लेऑफ संघ ठरले

*महिला प्रीमियर लीगमध्ये तीन प्लेऑफ संघ ठरले*

*स्मृती मंधानाचा आरसीबी आणि गुजरात जायंट्स बाहेर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या १७ व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा तीन गडी राखून पराभव केला. सोमवारी (२० मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक विजयासह यूपी संघाने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. पुढील फेरीत प्रवेश करणारा हा तिसरा संघ ठरला. आता प्लेऑफचे तीनही संघ निश्चित झाले आहेत. यूपीपूर्वी, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने स्थान मिळवले होते.

यूपीच्या या विजयासह गुजरात जायंट्ससह स्टार खेळाडू स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या विजयानंतर यूपीचे सात सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. आरसीबी आणि गुजरातला आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी यूपीचा पराभव आवश्यक होता, पण तसे झाले नाही. गुजरातचे आठ सामन्यांत केवळ चार गुण होते. त्याच वेळी, आरसीबीचे सात सामन्यांतून चार गुण आहेत. त्यांनी शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना केवळ सहा गुणांपर्यंतच मजल मारता येईल. अशा परिस्थितीत ते यूपीला मागे सोडू शकणार नाही.

गुजरातची सुरुवात चांगली झाली. सोफिया डंकले आणि एल वोल्वार्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने १७ आणि डंकलेने २३ धावा केल्या. हरलीन देओलला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली.

हेमलता ३३ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाली आणि गार्डनर ३९ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाली. दोघींनाही पार्श्वी चोप्राने बाद केले. अश्विनी कुमारीला पाच धावा करता आल्या. सुषमा वर्मा आठ धावा करून नाबाद राहिली आणि किम गर्थने एक धाव केली. पार्श्वी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अंजली सरवानी आणि सोफी एक्लेस्टोनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी ४.५ षटकांत ३९ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. कर्णधार अ‍ॅलिसा हिली १२, किरण नवगिरे चार आणि देविका वैद्य सात धावांवर बाद झाली. तीन गडी बाद झाल्यानंतर ग्रेस हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा यांनी डाव सांभाळला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. १४व्या षटकात ५७ धावा करून मॅकग्रा बाद झाली. तिने ३८ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार मारले.

मॅकग्रा बाद झाल्यानंतर ग्रेस हॅरिसने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ती बाद झाली. त्यानंतर यूपीला सात धावा करायच्या होत्या. हॅरिसने ४१ चेंडूत ७२ धावा केल्या. यादरम्यान तिने सात चौकार आणि तीन षटकार मारले. सोफी एक्लेस्टोनने १३ चेंडूत नाबाद १९ धावा करून सामना संपवला. दीप्ती शर्मा सहा आणि सिमरन शेखने एक धाव करून बाद झाली. अंजली सरवानी खाते न उघडता नाबाद राहिली. गुजरातकडून किम गर्थने दोन बळी घेतले. मोनिका पटेल, अॅश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

ग्रेस हॅरिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 16 =