You are currently viewing भवानी चौकात शंकर नामधारीचा खुलेआम मटका सुरू…

भवानी चौकात शंकर नामधारीचा खुलेआम मटका सुरू…

शाळेच्या गणवेशातील मुले खेळतात मटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशावादी उद्योग म्हणजे दारू, जुगार आणि मटका…!काहींच्या उत्पन्नाचा स्त्रोत तर काहींच्या बराबादीचा मार्ग सुद्धा हीच त्रिसूत्री…! त्यातलाच युवा पिढीला बरबाद करणारा हैवान म्हणजे मटका…! सावंतवाडीच्या बाजारपेठेत खुलेआम मटका सुरू असतो, ना गाजावाजा ना कुठली कारवाई, सर्वकाही आलबेल… जसं काय मटका म्हणजे वैद्य व्यवसाय.
सर्वात जास्त काळजीचे कारण म्हणजे सावंतवाडीतील भवानी चौक म्हणजेच मासळी मार्केटच्या तिठ्यावर एका दुकानात शंकराचे नाव धारण केलेला माजी लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीचा जीवनसाथी खुलेआम मटका घेतो आणि त्याच्या दुकानावर तेथीलच एका माध्यमिक शाळेची मुले शाळेच्या गणवेशात मटका लावतात. सदर प्रकार पाहणाऱ्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना याबाबत कळवून देखील “बघतो” एवढेच म्हणतात परंतु कारवाई होत नाही. त्यामुळे उद्याचे भविष्य असलेल्या नव्या पिढीचा पायाच मटक्याच्या अवैध्य व्यवसायावर उभा राहणार की काय…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या आवारापासून निर्धारित अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे परंतु अवैध्य व्यवसाय करण्यास मुभा आहे का? असा प्रश्न आता सर्वसाधारण नागरिकांना पडायला लागला आहे. शाळेच्या जवळपास सुरू असणाऱ्या अशाप्रकारच्या अवैध्य व्यवसायामुळे पालकांना देखील आपली मुळे शाळेत पाठविताना विचार करण्याची वेळ येते, आणि असे अवैध्य व्यवसाय शाळेच्या जवळपास सुरू असल्यावर शाळांची देखील पत घसरते. पालकवर्ग अशावेळी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतात.
संवाद मीडियाने काही महिन्यांपूर्वी याच मटका स्टॉल बाबत आवाज उठवला होता. सावंतवाडी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी त्या मटका व्यावसायिकावर रीतसर कारवाई देखील केली होती. त्यामुळे मटक्याचे दुकान काही काळ बंद होते. त्यावेळी शंकराचे नामधारी हा मटका व्यावसायिक बाजूच्या साई मंदिरच्या मागे बसून मटक्याचा व्यवसाय करत होता. अलीकडे पुन्हा त्याच मटका स्टॉलवर व्यवसाय सुरू झाला असून शाळकरी मुळे गणवेशात मटका लावत असल्याने तरुण पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे देखील अलीकडे सदर प्रकरणावर लक्ष देत नसल्याने, बाजारपेठेतील अनेक मटक्याच्या टपरीवर खुलेआम मटका सुरू असतो. परंतु सावंतवाडीत शाळांच्या आसपास खुलेआम मटका सुरू असल्याने सदर प्रकार हा गंभीर असून पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने त्यावर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा खाण्यासाठी म्हणून पैसे आणणारी शाळेतील मुले मटक्याच्या नादी लागून आपले भवितव्य अंधारमय करून घेतील अशी भीती व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा