मालवण :
मालवण तालुक्यातील मसुरे – मसदे मार्गावरील वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) यांनी व्हेल मासा उलटी (अंबरग्रीससह) सदृश पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणी कणकवली, कुडाळ, मालवण सह ठाणे व सांगली येथील ताब्यात घेण्यात आलेल्या ९ संशयितांवर वन्य जीव अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्हेलंच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने मसदे मसुरे मार्गांवर शुक्रवारी सापळा लावला. यावेळी ओमनी व इको अशा दोन कार त्याठिकाणी येऊन थांबल्यावर त्यांच्यावरील संशयाने एलसीबी पथकाने दोन्ही गाड्यांची झडती घेतली असता ओमनी गाडीत १२ किलो ५२८ ग्रॅम व इको गाडीत ११ किलो ४३६ ग्रॅम वजनाची व्हेलंची उलटी सदृश्य पदार्थ (अंबरग्रीस ) सापडून आला.
याप्रकरणी अंबरग्रीससह दोन कार, एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले असून तुषार चंद्रकांत घाडी वय ३२, रा. भरणी घाडीवाडी कणकवली, बजरंग आत्माराम कदम वय ५४ सांगली. सतीश शांताराम मोरे वय ५४ भाईंदर ठाणे. अजित नारायण घाडीगांवकर वय ४६ कळसुली कणकवली, अनिकेत प्रकाश चव्हाण वय ३२ मसुरे, शशांक प्रकाश पवार ३४ तरळे कणकवली, हेमंत अशोक मेथर वय ४९ कोळंब मालवण, पांडुरंग चंद्रकांत राणे वय ३८ मसुरे, प्रवीण चंद्रकांत भोई वय ३५ कुडाळ भोयाचेवाडी केरवडे अशा ९ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ या कायद्या अंतर्गत कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८,५१ नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नोटिसा बजावणी तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय यादव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुहास पांचाळ, संतोष नांदोसकर करत आहेत. व्हेल उलटी पदार्थ तपासणीसाठी नागपुर येथे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस निरीक्षक आर. बी. शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकाँस्टेबल अनिल धुरी, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, काँस्टेबल प्रथमेश गावडे, यश आरमारकर, रवी इंगळे, चंद्रहास नार्वेकर, चंद्रकांत पालकर हे सहभागी झाले होते.