*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित लेख*
*मोबाईल हरवला तर..*
एकदा काय झालं? मोबाईल हरवला.घरभर शोधला.
इकडे तिकडे. गादीखाली, सोफाखाली,बाथरुममध्ये,अगदी फ्रीजमध्येही..काय करणार? आजकाल विस्मरण फारच
होत ना? डाव्या उजव्या हाताने कुठेही काहीही ठेवलं जातं!
सकाळपासून कुठे कुठे गेले ते आठवत होते. सोसायटीत वाॅकला गेले होते..ट्रेलवर पडला का? नाहीतर लिफ्टमध्ये?
तुम्ही म्हणाल”दुसर्या मोबाईलवरुन नंबर फिरवून बघा ना..
नाहीतर घरातल्या कुणाला फोन करायला सांगा..”
अहो! इतकी कां मतीमंद आहे मी? माझ्याजवळ एकच
डीव्हाईस आहे. घरातही मी एकटीच असते.
आणि सकाळपासून कुणी मला फोन नसेल कां केला?
पांडुरंगदादा तर पहाटेच सुंदर फुलांचा गुच्छ पाठवतात.
एकही रिंग सकाळपासून वाजली नाही. आणि माझा फोन कधीही सायलेंट मोडवर नसतो..
मोबाईल हरवलाच. यावर शंभर टक्के शिक्कामोर्तब झाले.
एखाद्या जीवलग व्यक्तीचे अपहरण व्हावे तसे दु:ख जाणवले. अपहरणकर्त्याला कसे शोधून काढावे कळेना.
पोलीस कंम्पलेंट करावी का? शेजार्यांची मदतही घेता येईल. पांढरे केस झिंदाबाद!!सोसायटीतले तरुण बांधव करतात बरं मदत! उगीचच आपण आजकालची पीढी
तिरस्काराने मोडीत काढतो!
पण म्हटलं थांबूया! जरा वाट बघूया.
“धीर धरी रे धीरापोटी असतील मोठी फळे गोमटी.”
आणि आजी नेहमी म्हणायची जे जाते ना ते आपले नसते.
आणि जे आपले असते ते परत मिळते.
हा आशावाद छान होता. शिवाय ती हेही म्हणायची “जे होते ना ते चांगल्या करिताच.”
म्हणजे बरेच झाले मोबाईल हरवला ते. मस्तकशूळ नाही.
सारखे उठून लाईक्स मिळाले का आपल्या पोस्टवर— तपासणे नाही.समुहावरच्या उपक्रमांचे दडपण नाही.
नो गेम्स नो चॅटींग. फोन हँग झाला..गॅलरी साफ करा.
यांचे व्हीडीओ ऐका,यांच्या कविता वाचा,त्या अलक,अभंग,
गझल लावण्या,बापरेबाप! अभिष्टचिंतने,श्रद्धांजल्या सगळं
एकाच भावनेने..चुकून एखाद्याच्या वाढदिवसाला भावपूर्ण
श्रद्धांजलीचा ईमोजी नको जायला.किती दडपणे..
हा अनाहुतपणे आयुष्यात घुसलेला ,अगदी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” झालेला हा घुसखोर विनासायास गायब झाला ते बरंच झालं.
खरंच आजचा मुक्त दिवस! हातांना,बोटांना,मनाला विश्रांती!
आजकाल पेपरही नीट वाचत नाही आपण.आज शब्द ना शब्द वाचू. टी.व्हीलाही सुट्टी देऊ. त्या भिक्कार मालिका नकोच बघायला. असो! तो एक निराळाच विषय. वाढदिवसाला गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे पुस्तक मिळाले आहे. शिवाय पांडुरंगदादांची “विचारांची शिदोरी” आहेच. आज निवांत वाचूया.
शांत जेवले. चक्क कपाटे वगैरे रचली. अवांतर सफाईही केली. बागेतल्या झाडांशी गप्पा केल्या. कधी न मिळणारी आई अचानक मिळावी तश्शी आनंदली बिचारी झाडं माझी.
आजचा दिवस तर संपला. छान गेला का? कसलं हो!
सतत ,दिवसभर मनाच्या कोपर्यात तो होताच.अगदी विरहातल्या प्रियकरासारखा.
उद्या मँगोत (मोबाईल शाॅपी) जाऊ. नवीन मोबाईल घेऊ.
सिम कार्ड बदलेल. नंबर बदलेल.सारे काॅन्टॅक्ट्स जातील.
रामराम! किती काम!
इतक्यात बेल वाजली. दार उघडलं. दारात पांडुरंगदादा.
ओरडतच होते.
“काय ताई कुठेही फोन विसरता?”
“पण तुम्हाला कुठे मिळाला?”
“आधी पेनल्टी काढा.”
झालं असं! कुणा हरीश्चंद्राला माझा फोन सापडला. फोनमधल्या काॅन्टॅक्ट्समधे पांडुरंगदादांना कॉल करणे संयुक्तीक वाटले असेल. (खरेच आहे म्हणा ते!नावाप्रमाणे
भक्तांसाठी धावणारे ते आणि तेच)
बाकी पुढची कथा तुम्ही जाणलीच असणार.
त्या अज्ञात व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर पांडुरंग दादा जातीने पोहचले आणि हा मुद्देमाल घेउन तडक मम निवासी येते झाले.
सखा मोबाईल..सुबहका भुला सांजको वापस आया.
दोन प्रेमी जीवांची गळाभेट झाली. संपला विरह.
“थँक्यु थँक्यु दादा!”
“थँक्यु काय? चहा टाका.”
“हो दादा! चहाच काय गरम भजीही करते…”
*राधिका भांडारकर.*