कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका महत्वाची – मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. कमी वजनाची किंवा कुपोषीत बालके जन्माला येवू नयेत यासाठी पोषण आहाराच्या माध्यमातून गरोदर व स्तनदा मातांना प्रथिनयुक्त सकस आहार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका महत्वाची आहे. त्याबाबतचा जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येवून निधीची उलब्धता करुन दिली जाईल, असे आश्वासन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्यावतीने नवीन जिल्हा नियोजन सभागृहात आदर्श पर्यवेक्षिका, अंगवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पल्लवी गावडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदकर, जिल्हा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.
श्री. नायर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये बालकांचे आरोग्य चांगले असून कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यात कमी वजनाचे अथवा कुपोषित बालक जन्माला येवू नये यासाठी गरोदर मातांच्या आहारावर लक्ष देणे आवश्यक आहे. गरोदर व स्तनदा माता यांना पावसाळ्याच्या कालावधीमध्ये प्रथिनयुक्त आहार पुरेशा प्रमाणात मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी भर द्यावा. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी चांगले काम केले असल्यामुळे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि.) संतोष भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात करताना म्हणाले, आरोग्य सेविका व मदतनीस आरोग्य व समाज शिक्षणाच्या माध्यमातून सदृढ व सशक्त समाज घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सोहळा आयोजीत केला आहे. त्याबरोबरच महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार, प्रसार व प्रसिध्दी व्हावी आंगणवाडी सेविका, मदतनीस आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद रहावा यासाठी सिंधुसंवाद प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजेंद्र पराडकर,महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, पर्यवेक्षिका उल्का हजारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन क्रान्तीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सिंधुकन्या व सिंधुसंवाद या प्रणालीचे अनावरण करण्यात आले. पोषण पंधरवड्याचा शुभारंभही याप्रसंगी करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंर्गत कु.काव्या अमित भोगले हीच्या आई वडिलांना बचत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास योजनेतर्गंत अंगणवाडीस्तरावर उत्कष्ट काम केलेल्या पर्यवेक्षिका उल्का हजारे, शैलजा मातोंडकर. अंगणवाडी सेविका संजना देवळेकर, शशिकला हळदकर, अपर्णा देसाई, आराध्या वाळवे, मिताली देसाई, गौरी देऊलकर, दिपिका बांदेकर, संयोगिता वाडकर. मिनी अंगणवाडी सेविका प्रणाली कदम, संगिता कदम, स्मिता बोभाटे, नंदिनी सावंत, मनिषा वेंगुर्लेकर शीतल परब, अश्विनी राणे, ललिता गवस.
अंगणवाडी मदतनीस रक्षिता गावकर, कांचन रावराणे, विशाखा देसाई, वैशाली लाड, समृध्दी मेस्त्री,स्वप्नाली पालकर, सुप्रिया वारंग, अश्विनी ठाकूर यांचा स्मृतीचिन्ह व पुष्प देवून सन्मान करण्यात आली. यावेळी पोषण आहार संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. आभार तालुका महिला बाल कल्याण अधिकारी अमोल पाटील यांनी मानले