काळसे बागवाडीतील शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रलंबित नुकसानभरपाई
माजी खासदार निलेश राणेंच्या तहसीलदारांना सूचना;शेतकऱ्यांनी मानले राणेंचे आभार
मालवण (प्रतिनिधी)
काळसे बागवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांचे २०१९ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जाहीर झालेल्या मदतीसाठी विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारकडून निधीची तरतूद करूनही मालवण तहसील प्रशासनाकडून ही नुकसान भरपाई देण्याबाबत विलंब होत असल्याने भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन प्रलंबित नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी सूचना केली. यावर तहसीलदार पाटील यांनी उद्या १४ मार्च रोजी नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे याबाबत उपस्थित नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत निलेश राणे यांचे आभार मानले.
२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसान ग्रस्तांना जाहीर झालेली मदत अद्यापही त्यांना न मिळाल्याबाबत आज निलेश राणे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, आशिष हडकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर यासह अन्य भाजप पदाधिकारी तसेच काळसे येथील नुकसानग्रस्त ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते.
२०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे काळसे बागवाडी येथील भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही त्यासाठी जाहीर झालेली मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विद्यमान शिंदे -फडणवीस सरकार कडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीची तरतुद झालेली असून ती तहसील प्रशासनाकडून प्रलंबित असल्याने ती तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करावी, असे निलेश राणे यांनी तहसील पाटील यांना सांगितले. सदर नुकसान भरपाईची रक्कम उद्या १४ रोजी नुकसान ग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
यानंतर बोलताना निलेश राणे म्हणाले, २०१९ मध्ये जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम ठाकरे सरकार नुकसानग्रस्ताना देऊ शकले नाही. मात्र, शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर सात महिने होत असून याबाबत आम्ही मागणी केल्यावर नुकसान भरपाईसाठी तात्काळ निधीची तरतुद करण्यात आली. सध्याच्या राज्य सरकार कडून झटपट कामे होत आहेत याचेच हे एक उदाहरण आहे, असेही निलेश राणे म्हणाले.