You are currently viewing संदेश अनंतात विलीन…..

संदेश अनंतात विलीन…..

आज गोव्यात अँडमीट असणाऱ्या स्नेहीना भेटून रात्रो साडेआठ वाजता घरी पोहचलो..आणि आमचे पुण्याचे मित्र माउली दारवटकर यांचा मेसेज पाहिला.”संदेश कोंडविलकर यांचे निधन”.मेसेज वाचून जागच्या जागी स्तब्ध झालो..माझ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवन प्रवासातील एक सहप्रवासी आणि जेष्ठ मार्गदर्शक मी कायमचा गमावला. खूपच मनाला वेदना देणारी दुःखद बातमी.
ज्या काळात “भाजपा”सर्वाथाने अस्पृश्य होता तेव्हा मुंबई महानगरात जे काही मोजकेच दलीत कार्यकर्ते भाजपाचा झेंडा घेऊन आणि भाजपातेरांची अहवेलना सहन करुन काम करत होते त्यात स्व.रमेश मेढेकर, मा.विद्यमान विधान परिषद सदस्य आणि माजी मंत्री विजयभाई गिरकर आणि संदेश कोंडविलकर ही नावं प्रकर्षाने घ्यावी लागतील. संघपरिवाराच्या कामाचे ते “मंतरलेले दिवस” होते. कोणतीही साधनसुविधा नसताना प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष कसा करावा? हे शिक्षण आम्हाला संदेशजी कडून मिळालं..आमची सुमारे पंचवीस वर्षांची मैत्री. त्यांच्या राजकीय जीवनातील चढ उतारांचा मी साक्षीदार आहे.भारतीय जनता पक्षाचा मुलभूत विचार, प्रचार आणि प्रसार व भविष्यकालीन रणनीती ज्यांनी या महाराष्ट्रात आखली त्या वसंतराव भागवतानी जे अनेक मोहरे घडवले ज्यामध्ये स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.वामनराव परब, ज्यामध्ये संदेश कोंडविलकरही होते.
आताच्या डिजीटल झगमगाटात बारामतीला जावून मा.शरद पवाराना कुणीही राजकीय आव्हान देईल…नव्हे देतात..पण १९९० च्या काळात मा.संदेशजी पवारांच्या बारामतीत दहा बारा कार्यकर्त्याना घेऊन भिडत होते. भ्रष्टाचारावर बोलत होते..पक्षासाठी कार्यकर्ते शोधत होते.त्यांना तयार करत होते. मी त्यांच्या बरोबर खूप प्रवास केला. खूप फिरलो..
मला आठवत, लोकसभेच्या निवडणुकीत मा.स्व. चिंतामण वनगा यांच्या प्रचारासाठी आठ दिवस त्यांच्या बरोबर होतो. निदान पालघर मध्ये आता दळणवळणाची सोय आहे.भौगोलिक द्रिष्टया मतदार संघ अगदीच कठिण..एका पाड्यातून एक बैठक आटोपून निघत असताना गाडीला अपघात झाला.रात्रीची वेळ.आडभागाचा रस्ता. ड्रायव्हर सह आम्ही फक्त चारजण.संपर्क होईना. रात्रौ बारा वाजता एक ट्रक संदेशजीनी थांबवला आणि त्या टपावर बसून आम्ही पालघरच्या मुख्य कार्यालयात पोहचलो.कोकणात तेव्हा युतीचे उमेदवार आदरणीय सुरेशजी प्रभू यांच्या निवडणूकीत कोकणसंघटक म्हणून संदेशजीवर जबाबदारी होती तेव्हा राजापूर, देवाचे गोठणे या ठिकाणी रात्रीचे असेच अडकलो होतो..अनेक आठवणी.. अनेक प्रसंग आहेत…भाजपाला आज आलेल्या या सुगीच्या दिवसामागे अशा असंख्य संदेशांचं समर्पण आहे.
ते काही वर्षे महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस होते.युती शासनाच्या काळात सहा वर्षे विधान परिषद सदस्य होते.राजकारणात त्यांच्या काही चुका झाल्या असतील. त्याची जबर किमंत त्यांना मोजावी लागली..मी पाहिलयं आणि प्रत्यक्ष अनुभवलय पण कि सगळ्याच पक्षात काम न करणाऱ्या,फक्त लाभ उठवणाऱ्या पण “कानफुकेगिरी “करणाऱ्याचा एक गट सतत कार्यरत असतो.तो फक्त नेत्यांच्या दौऱ्याच्याच वेळी मागे-पुढे झिंदाबादच्या घोषणा देत असतो…आणि नेतेही अशा कानफुकेगिरीला बळी पडतात आणि पक्षासाठी, समाजासाठी सातत्याने रचनात्मक काम करणाऱ्या संदेशजी सारख्या कार्यकर्त्याना गमावतात.. अर्थात हे सगळ्याच राजकीय पक्षात चालतं.
भाजपापासून.फारकत घेतल्यानंतर संदेशजीनी महाराष्ट्रातील काही समविचारी आणि रचनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन राष्ट्रशक्ती या सामाजिक स़घटनेची स्थापना केली.ज्यात पुण्याचे जिल्हाप्रमुख श्री माऊली दारवटकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मी, तीनचार वर्षे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले होते…पण संदेशजींचा राजकीय पिंड आणि सामाजिक काम हे सूत्र जमले नाही. मात्र या निमित्ताने हे अभिमानाने मला नमुद करायला हवे कि संदेशजी कोंडविलकर यांनी जन्माला घातलेल्या राष्ट्रशक्तीच्या कामाची दखल अवघ्या पुणे जिल्ह्यातील प्रशाशनाला घ्यावीच लागते. नव्हे घेतात. एवढं प्रभावी काम आज पुणे जिल्ह्यात माझे आणि संदेशजींचेही मित्र माऊली दारवटकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
राष्ट्रशक्तीच्या कामाला पूर्णविराम दिल्यावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी त्यांना प.महाराष्ट्राच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी व चर्मोद्योग महामंडळाचे अध्यक्षही केले होते.हा प्रवास सुरु असताना त्यांना त्यांची तब्येत साथ देत नव्हती.मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
माझे त्यांचे राजकारणा पलिकडेचे कौटुंबिक संबध होते. चार वर्षापूर्वी माझी मोठी मुलगी स्नेहल हिच्या लग्नाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्यासाठी आजारी असतानाही ते आले होते. मागच्या वर्षी मी त्यांना भेटायला मुद्दामहून गेलो होतो.त्यांचे वकिल असलेले जावयी माजगावकर यांचेकडून कधीतरी खुशाली कळायची…पण आज ही माझ्या द्रुष्टीने अतिशय दु्ःखद बातमी समजली.
संघटन वाढवणारा, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा,सामान्य कार्यकर्त्याला सन्मान देणारा, परिस्थितीची जाणीव असणारा, पडेल ते काम करण्याची मानसिकता असणारा एक सच्चा कार्यकर्ता अनंतात विलीन झाला.
एक भल मोठ पुस्तक होईल एवढ्या आठवणी आणि प्रसंग आहेत..भले मला या मित्रापासून कधीच कोणता राजकीय, आर्थिक किंवा इतर कोणताच लाभ झाला नसेल पण संघर्षशील कार्यकर्ता कसा असावा याचा परिपाठ मला संदेशजीनी दिला.जो मी गिरवत आहे..
संदेशजीनी विशेषतः कोकणात जोडलेले अनेक कार्यकर्ते आहेत.त्यातले काही मोजकेच भाजपाच्या प्रवाहात आहेत..काही अन्य पक्षातही असतील..पण त्या कार्यकर्त्यांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेशजीनी दिलेला “संदेश”ते विसरणार नाहीत.
कोंडविलकर कुटुंबियांवर हे कोसळलेले संकट फार मोठं आहे.या संकटाचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य आदरणीय वहीनी,भाऊ विलास आणि त्यांच्या सर्व.कुटुंबियांना परमेश्वराने द्यावे हीच मनोमन प्रार्थना.
संदेशजीना अटल व.स्नेहप्रिया परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली!
…. शोकाकुल…
… अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा