You are currently viewing एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीला आळा घालण्यास शासनाकडे पाठपुरावा करणार…
आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीला आळा घालण्यास शासनाकडे पाठपुरावा करणार…

आमदार वैभव नाईक ; मत्स्यमंत्र्यांचे मानले आभार, पॅकेजमधून मालवणला १२ कोटीचा निधी मिळेल…

मालवण प्रातिनिधी :
मच्छीमारांना केवळ आर्थिक पॅकेज मिळवून देऊन आपण स्वस्थ बसणार नाही तर एलईडी सारख्या विध्वंसकारी मासेमारीला आळा घालण्यास कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यासह कोकणातील मच्छीमारांचे प्रश्न सातत्याने शासनाकडे मांडल्यानंतर मत्स्यमंत्री अस्लम शेख यांनी दिलेला शब्द पूर्ण करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांसाठी ६५ कोटी १७ लाखांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यासाठी मी सर्व मच्छीमारांच्यावतीने मत्स्यमंत्री शेख यांचे आभार मानतो. या पॅकेजचा सर्वाधिक फायदा मालवण तालुक्यातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना होईल. यात तालुक्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.
मागील मासेमारी हंगामात क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसानग्रस्त झालेल्या मच्छीमारांना राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाखांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, बबन शिंदे, बाबी जोगी, संजय केळुसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आम. नाईक म्हणाले, क्यार व महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसह मच्छीमारांचे विविध प्रश्न आपण मत्स्यमंत्री अस्लम शेख व राज्यसरकारकडे मांडले. यात जिल्ह्यातील मच्छीमार नेत्यांचीही आपणास साथ मिळाली. याची दखल घेऊन मत्स्यमंत्री अस्लम शेख यांनी मच्छीमारांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांसाठी ६५ कोटी १७ लाखांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यासाठी आपण सर्व मच्छीमारांच्यावतीने मत्स्यमंत्री शेख यांचे आभार मानले.

नुकसानग्रस्त मच्छीमारांसाठी जाहीर झालेल्या आर्थिक पॅकेजचा सर्वाधिक लाभ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला किंबहुना तालुक्याला होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार १२ कोटी रुपयांचा निधी हा तालुक्यातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना मिळणार आहे. तालुक्यात मच्छीमारांची संख्या मोठी आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी येथील मच्छीमार प्रतिनिधींनीही आपणास साथ दिली. जाहीर झालेली आर्थिक मदतीची रक्कम प्रत्येक नुकसान ग्रस्त मच्छीमारांपर्यंत पोचविण्यासाठी लवकरच योग्य ते नियोजन व कार्यवाही केली जाईल असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

मच्छीमारांना नुकसान भरपाई पॅकेज जाहीर झाल्यानंतर एलईडी लाईट मासेमारी सारख्या अवैध मासेमारीबाबत कडक धोरण राबविण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. आर्थिक पॅकेज सारख्या हितकारक निर्णयाबरोबरच राज्य सरकारने एलईडी मासेमारी बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचीही भूमिका घ्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्यमंत्री अस्लम शेख यांच्याकडे करणार आहोत. यंदाच्या मासेमारी हंगामात एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. तसेच मासेमारी व्यवसायासाठी स्थानिक मच्छीमारांकडे येणाऱ्या बाहेर गावातील खलाशांना दहा दिवसांचे क्वारंटाईन करण्यात यावे यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 9 =