You are currently viewing जिल्हा परिषद सदस्य मूक गिळून गप्प का? ……

जिल्हा परिषद सदस्य मूक गिळून गप्प का? ……

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल

कुडाळ

लाड पागेे, अनुकंपा भरती प्रक्रिया, हाफकीन संस्थेमार्फत आरोग्य उपकरणे खरेदीमधील अनियमितता यांसारख्या जिल्हा परिषदेतील गैर कारभाराच्या घटना समोर येत असताना सत्ताधाऱ्यांसहित विरोधी पक्षाचे जि.प. सदस्य मूक गिळून गप्प का? असा सवाल मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे

“‘तेरी भी चूप…मेरी भी चूप” अशी सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना यांची जिल्हा परिषदेमधील पडद्यामागील छुपी युती जनतेसमोर उघड आहे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतातून झालेल्या गैरकारभारांची अनेक प्रकरणे अलीकडील काळात समोर आली आहेत. यामध्ये विशेषतः लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार परजिल्ह्यातील भरती केलेले उमेदवार असो, अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रियेतील अनियमितता असो की हापकिन या बाह्यस्त संस्थेला आरोग्य उपकरणे खरेदीसाठी देण्यात आलेेले 27 लाख रुपयांचे प्रकरण असो अशी प्रकरणे उघड होऊन देखील जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना यांचे जिल्हा परिषद सदस्य याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहित हे सिंधुदुर्गवासी यांचे खरे दुर्दैव म्हणावे लागेल.कंत्राटी कामांसाठी जी कर्तव्यदक्षता दाखवण्यात येते जनतेच्या प्रश्नांबाबत व जिल्हा वासियांच्या निगडित विषयांबाबत दाखवण्यात येत नाही असे एकंदर चित्र आहे.उलट छुपी युती करून एकमेकाना सावरून घेत करू भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालायचे व आपली कामे करून घ्यायची ही कार्यपद्धती ही पद्धत जिल्ह्यातील जनता आता ओळखून चुकलेली आहे.जिल्हा परिषदेमध्ये परजिल्ह्यातील भ्रष्ट कर्मचारी अधिकारी यांचे रॅकेट कार्यरत असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून महत्वाच्या पदभारांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवतात अशा काही तक्रारी सर्रासपणे कानावर येतात मात्र जिल्हा परिषद सदस्य त्याबाबत कधी पोटतिडकीने बोलताना दिसत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. “आंधळ दळतंय व कुत्र पीठ खातयं” असा कारभार चालला असताना जिल्हा परिषदेत जनतेने निवडून दिलेले “कारभारी” मात्र चिडीचूप का बसले आहेत याचा जनतेनेच विचार करावा असे आवाहन मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा