You are currently viewing अजूनही संवेदनशीलता जिवंत आहे – अमित सामंत

अजूनही संवेदनशीलता जिवंत आहे – अमित सामंत

कुडाळ :

“माणसाप्रती असलेली संवेदनशीलता जपुया. अडचणीत सापडलेल्या माणसांना जमेल तशी मदत करूया. मांडकुली येथील भक्ती गुरुनाथ सामंत या निराधार अंध भगिनींच्या पाठीशी समाज उभा राहिला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, असे उद्गार अमित सामंत यांनी काढले

ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्था व दैनिक तरुण भारत यांच्या पुढाकाराने मांडकुली येथील भक्ती गुरुनाथ सामंत या निराधार महिलेच्या सन्मानार्थ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक तरुण भारत व बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात शेखर सामंत यांनी वस्तुस्थिती समाजासमोर ठेवल्यानंतर विविध स्तरातून भक्ती सामंत यांना लोकांनी जी दिलेली भरघोस मदत आहे. त्याचा अर्थ अजूनही समाजामध्ये संवेदनशीलता जिवंत आहे. ही खरच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे, असे सांगत आपल्या पुढील मनोगतामध्ये “एखाद्या व्यक्तीला जगायचं असताना जगाचा निरोप घ्यावा लागणे ही मनाला चटका लागणारी गोष्ट आहे. व्यक्ती निघून गेल्यावर गळा काढण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून जिवंत असताना समाजाने दुःखीजणांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याला आधार दिला पाहिजे, असे सांगत त्यांनी स्वतः या कुटुंबासाठी आर्थिक रूपाने मदतीचा हात पुढे केला.

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व दै.तरुण भारत सिंधुदुर्ग – रत्नागिरी आवृत्तीचे मुख्य संपादक शेखर सामंत यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर भक्ती सामंत आपल्या दोन्ही मुलांसमवेत उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, रत्नागिरी -सिंधुदुर्ग तरुण भारत आवृत्तीचे मुख्य संपादक शेखर सामंत, वेतोरेच्या हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका नीलिमा वालावलकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, सीबीएसई बोर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, समीर चराटकर, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर व नारी समता मंचच्या पदाधिकारी, उद्योजक दिलीप मालवणकर, राजन नाईक इ.उपस्थित होते.

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे साडी- चोळी, शाल व श्रीफळ, शालेय उपयोगाच्या वस्तू, पोशाख व रोख २०००० रुपये देऊन श्रीम. भक्ती गुरुनाथ सामंत व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांपैकी सुद्धा अनेक व्यक्तींनी भक्ती सामंत कुटुंबीय यांना रोख स्वरूपात मदत दिली.

त्यानंतर बोलताना उमेश गाळवणकर यांनी “हरवले आभाळ ज्यांचे त्यांचा सोबती होण्यासारखे महान कार्य नाही”. असे सांगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था अशा प्रसंगातून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा सदैव प्रयत्न करत असते. ज्यांच्या घरावरचे छप्पर हरवले आहे त्यांना आसरा ही आपण आपल्या पद्धतीने दिला पाहिजे, “असं सांगितले.

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेकडून भक्ती गुरुनाथ सामंत यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. संस्थेच्या वतीने रोख रुपये २००००₹, जीवनोउपयोगी वस्तू, तसेच इतर, विवेक मराठे – १००१₹, समिर चराठकर – ५०००₹, महिला उत्कर्ष समितीतर्फे ६५००₹, फिजिओथेरपी महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय – ५८००₹, शुभम मालवणकर – १००००₹, के.बी.जी.एस.महिला सिंधुदुर्ग – ११०००₹, संतोष घुर्र्ये – १०००₹, प्राजक्ता वालावलकर – १०००₹, सिंधुदुर्ग वारियर्स कडून १७२,०००₹असे एकूण २३३३०१₹.. रोख स्वरूपात भरिव अशी मदत करण्यात आली..

उपस्थितांच्या वतीने वेतोरे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापक नीलिमा वालावलकर, महाराष्ट्र स्काऊट गाईड विभागाच्या माजी सदस्या सुलभा देसाई यांनी आपली मनोगतं व्यक्त करताना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने निराधार लोकांना आपण आपल्या पद्धतीने जेवढेशी मदत करता येईल तेवढी मदत करूया. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था व दैनिक तरुण भारत यांच्याने घालून दिलेला आदर्श त्याचा आपण मागोवा घेऊया. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत रंजलेल्या गाजलेल्या मदत करुया, असे सांगत महिला दिनानिमित्त आयोजित नारी सन्मान या आगळ्यावेगळ्या कृतीशील कार्यक्रमाचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा