You are currently viewing गुजरात जायंट्सचे खाते उघडले

गुजरात जायंट्सचे खाते उघडले

*गुजरात जायंट्सचे खाते उघडले*
*आरसीबीचा सलग तिसरा पराभव*
*सोफिया डंकले-हरलीन देओल आणि गार्डनर चमकले*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

या विजयासह गुजरातने गुणतक्त्यात आपले खाते उघडले. त्यांना तीन सामन्यांत दोन गुण मिळाले. गुजरातची निव्वळ धावगती -२.३२७ आहे. आरसीबी संघाचे खाते उघडले गेले नाही आणि ते तळाच्या पाचव्या क्रमांकावर आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. बुधवारी (८ मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्सने त्यांचा ११ धावांनी पराभव केला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत सात गडी बाद २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत ६ बाद १९० धावाच करू शकला.

यूपी वॉरियर्सचे दोन सामन्यांतून दोन गुण आहेत, परंतु चांगल्या धावगतीमुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर गुजरात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबी संघाचे खाते उघडले गेले नाही आणि ते तळाच्या पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी चार गुण आहेत. उत्तम धावगतीसह मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरातची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. सब्बिनेनी मेघना आणि सोफिया डंकले यांनी २२ धावांची भागीदारी केली. मेघना आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिच्यानंतर फलंदाजीला आलेल्या हरलीन देओलने डंकलीला चांगली साथ दिली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. २८ चेंडूत ६५ धावा करून डंकले बाद झाली. तिने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. महिला प्रीमियर लीगमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

डंकले बाद झाल्यानंतर हरलीन देओलने अॅशले गार्डनरसह ३६ चेंडूत ५३ धावा जोडल्या. गार्डनर १९ धावा करून बाद झाली. दरम्यान, हरलीनने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला दयालन हेमलता (१६ धावा) आणि अॅनाबेल सदरलँड (१४ धावा) यांनी उपयुक्त योगदान दिले. ४५ चेंडूत ६७ धावा करून हरलीन बाद झाली. कर्णधार स्नेह राणाने दोन धावा केल्या. सुषमा वर्माने पाच आणि किम गर्थने तीन धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटील आणि हीदर नाइटने प्रत्येकी दोन बळी घेतले. मेगन शुट आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

स्टार खेळाडूंनी भरलेला आरसीबी संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला. सोफी डिव्हाईनने ६६ धावांची खेळी केली. अॅलिस पॅरीने ३२ आणि कर्णधार स्मृती मंधानाने १८ धावा केल्या. दोघींनी चांगली सुरुवात केली पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. हेदर नाइटने वेगवान खेळी केली, पण ती संघासाठी पुरेशी ठरली नाही. तिने ११ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. रिचा घोष आणि कनिका आहुजा प्रत्येकी १० धावा करून बाद झाल्या. श्रेयंका पाटीलने नाबाद ११ धावा केल्या. पूनम खेमकरला केवळ दोन धावा करता आल्या. गुजरातसाठी ऍशले गार्डनरने गोलंदाजीत एकदाच आश्चर्यकारक कामगिरी केली आणि तीन बळी घेतले. अॅनाबेल सदरलँडला दोन बळी मिळाले. मानसी जोशीने एक विकेट घेतली.

सोफिया डंकलेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने फलंदाजी करताना ६५ धावा केल्या होत्या

उद्या दिल्ली विरुद्ध मुंबई सामना संध्याकाळी ७:३० वाजता नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे कोणता संघ विजयाची हॅटट्रिक साधणार हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा