रक्त विकाऊ सरकारच्या विरोधात लवकरच सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा
शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.केद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील रक्त पुरवठ्याचे दर निश्चित केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशविचा दर ४५० होता तोच दर आता ११०० रु.करण्यात आला आहे.तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशविचा दर १५५० रु करण्यात आला आहे. त्याचबरोबर रेड सेल, फ्रेश फ्रोझेन प्लास्मा व इतर रक्तघटकांचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.
केंद्रातील भाजप सरकार जीवनावश्यक सर्वच गोष्टींचे दर वाढवीत असून गॅस, पेट्रोल, डीझेल,कडधान्य, लाईट बिल याचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत.केंद्रातील भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आता राज्यातील शिंदे भाजप सरकारने देखील लोकांचा जीव वाचवणाऱ्या रक्त पिशव्यांच्या पूर्वीच्या दरात ६५० रु वाढ करून आता रक्त पिशवी ११०० रु ला मिळणार आहे. ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसेल त्याला वाढीव दराचे रक्त उपलब्ध करता न आल्यास रक्ताअभावी रुग्णाला जीव गमवावा लागणार आहे. त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या रक्त विकाऊ शिंदे भाजप सरकारचा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जाहीर निषेध करत असून लवकरच या दरवाढी विरोधात युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.