You are currently viewing “क” वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतंर्गत नांदरुखच्या गिरोबा देवस्थानला दहा लाख रुपये मंजूर

“क” वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतंर्गत नांदरुखच्या गिरोबा देवस्थानला दहा लाख रुपये मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ग्राम सुविधा योजनेतंर्गतही दहा लाख मंजूर – भाई चव्हाण

 

कणकवली :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पुनित असलेल्या नांदरुख गावची ग्रामदेवता श्री देव गिरोबा देवस्थानला “क” वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतंर्गत मंदिर परिसर सुशोभीकरण या कामी रूपये १० लाख आणि ग्राम सुविधा योजनेतंर्गतही ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण करिता रूपये १० लाख असा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. आ. वैभव नाईक आणि त्यांच्या सहकार्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती या गावचे ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते गणपत तथा भाई चव्हाण यांनी येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना या मंदिराच्या परिसरात किल्ला बांधणार्या कसबी कारागिरांच्या सोयीसाठी बाजारपेठ वसवली होती. मंदिरा लगतच्या नैसर्गिक बारमाही तळी आणि तलावामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, नांदरुख गावची चतु:सीमा ही पुर्वी सद्याच्या मालवण शहरापर्यंत होती. शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी देखरेख करण्यासाठी नांदरुख गावातून ये जा करीत असत. त्यांच्या पाऊलखुणा आजही गावात आहेत.
पुर्वी सद्याच्या ८ गावांतील रहिवाश्यांची ग्रामदेवता ही गिरोबा आहे. हे देवस्थान गावच्या मध्यभागी असून परिसरातील तळी आणि तलावामुळे नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. गेल्या काही वर्षांत हे देवस्थान जागृत असल्याचा अनुभव भाविकांना आला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सढळ हस्ते देणग्यांमुळे या परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. त्यामुळे येथे वनभोजनासाठी अनेक शाळांच्या सहली येतात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, गावचे माजी सरपंच दिनेश चव्हाण आणि सहकार्यांनी भाविकांच्या देणग्यांतून तलाव सुशोभीकरण, कासव संगोपन आदी उपक्रम सुरू केले आहेत. मात्र तरीही अपेक्षित कामे होत नसल्याने दिनेश चव्हाण यांनी आ. वैभव नाईक, जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या माध्यमातून या मंदिराची तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न चालविले होते. त्याला आता यश आले आहे. आ. वैभव नाईक यांनी तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी रुपये १० लाख मंजूर करून घेतले आहेतच.

प्रतिक्रिया व्यक्त करा