मुंबईचा रसेल डिब्रेटो हिराज श्री 2023 चा मानकरी
इचलकरंजी / प्रतिनिधी
पिळदार शरीरयष्टी, युवकांचा जल्लोष, आकर्षक विद्युत रोषणाई अशा अभुतपूर्व वातावरणात झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईचा रसेल डिब्रेटो हा हिराज श्री 2023 चा मानकरी ठरला. इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर उपविजेता तर बेस्ट म्युझिक पोझरचा बहुमान मुंबई उपनगरचा अभिषेक खेडेकर याला मिळाला. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेनं आणि न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्यानं झालेल्या या स्पर्धेत 300 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धा पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती.
हिराज हेल्थ, फिटनेस सेंटर आणि हिराज फौंडेशनच्यावतीनं राज्यस्तरीय हिराज श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार राजु आवळे यांच्या हस्ते झालं. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, वाहतुक निरीक्षक विकास अडसुळ, स्वप्निल आवाडे, संजय कांबळे, मदन कारंडे, धनंजय माने, अभिजीत सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. 8 वजनी गट तसंच प्रत्येक वजनी गटात उंचीनुसार 170 सेंमीच्या खाली आणि वर अशा एकुण 10 गटात या स्पर्धा झाल्या. यामध्ये 55 किलो गटात मुंबई उपनगरचा नितीन शिगवण, 60 किलो गटात पश्चिम ठाण्याचा नितीन म्हात्रे, 65 किलो गटात कोल्हापूरचा चंद्रशेखर पवार, 70 किलो गटात मुंबईचा संदिप सावळे, 75 किलो गटात मुंबई उपनगरचा प्रतिक पांचाळ, 80 किलो गटात सांगलीचा विश्वनाथ वकाली, 85 किलो गटात इचलकरंजीचा अंजिक्य रेडेकर तर खुल्या गटात मुंबईचा रसेल डिबे्रटो यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मेन्स फिजीक स्पर्धेत 22 खेळाडु सहभागी झाले होते. यामध्ये ठाण्याचा यतीश ठाकरे यानं प्रथम क्रमांक पटकावला. या प्रत्येक गटातील विजेत्यांच्यातून मुंबईचा रसेल डिब्रेटो हा हिराज श्री 2023 चा मानकरी ठरला. इचलकरंजीच्या अजिंक्य रेडेकर याला उपविजेतेपद तर बेस्ट म्युझिक पोझरचा बहुमान मुंबई उपनगरचा अभिषेक खेडेकर याला मिळाला. यावेळी हिराज श्रीचा मानकरी रसेल डिब्रेटो याला 51,111, उपविजेता अजिंक्य रेडेकर याला 21 हजार 111 तर बेस्ट म्युझिक पोझर अभिषेक खेडेकर याला 11 हजार 111 रुपये आणि पारितोषिक देऊन अॅड. सचिन माने, राहुल शिरगुरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धा यशस्वीतेसाठी दिपक माने, बाळासाहेब माने यांच्यासह हिराज हेल्थ, फिटनेस सेंटर आणि हिराज फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पंच राजेश चव्हाण, सुनिल शिगडे, अब्दुल मुकादम, राजेश वडाम, महेश गणगे, राजेंद्र हेंद्रे, इनायत तेरदाळकर, संदीप यादव यांच्यासह 30 पंचांनी परिक्षणाची जबाबदारी सांभाळली.