You are currently viewing हृदयस्पर्शी पत्र …  स्वर्गिय अप्पा

हृदयस्पर्शी पत्र … स्वर्गिय अप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच सदस्या प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम पत्र लेखन*

*हृदयस्पर्शी पत्र ….*

स्वर्गिय अप्पा,
सा.दंडवत…

तुम्ही जाऊन खूप वर्षे झाली अप्पा.खरं तर खूप काही
मनात आहे , बोलायचं आहे. कशी सुरूवात करू तेच
समजत नाही.तुम्ही होतात तोवर तुम्हाला मी फारशी वेळ
देऊ शकले नाही याची सतत माझ्या मनात खंत आहे.
कारण तेव्हा आम्ही आमच्या संसाराच्या लढाईत मग्न
होतो, लढत होतो. हो अप्पा, जीवनाची लढाई सर्वांनाच
लढावी लागते ना? तुम्हाला तर माहित आहे मी लग्नानंतरच
माझे सारे शिक्षण पार पाडले ना? अवघ्या अठराव्या वर्षी
लग्न होऊन मी सासरी आले नि नंतर नाशिकला स्थिरावले.
मी नाशिकला आल्याने तुम्ही खुश होतात.हो, मुलगी सुस्थळी
पडल्याने तुम्ही निश्चिंत होतात.

तिकडे तुमचे वय वाढत होते. पण आई वडिल समर्थ असतात
असेच नेहमी मुलांना वाटते म्हणून आम्ही ही निश्चिंत राहिलो.
वय झाल्यामुळे आजारपणं येत होती पण नाना मदतीला होता
ना? तेवढ्या पुरती मी तुम्हाला भेटून जात असे व मनाचे समाधान करून घेत असे. तशी त्यावेळी आमची ही आर्थिक
परिस्थिती चांगली नव्हतीच. घरच्या जबाबदाऱ्या होत्या. मुलं
वाढत होती तसे प्रश्न ही वाढत होते व त्या विवंचनेत आमचे
दिवस जात होते. बाहेरून बी ए ची परीक्षा. त्यानंतर बी.एड्,
(दररोज बारा किलोमिटर चालत असे अप्पा मी! पाय हेच
त्या वेळी वाहतुकीचे साधन होते.)नंतर बाहेरूनच एम ए ची परीक्षा, त्यात लहान मुलगा असेही
व आर्थिकही प्रश्न खूप होते. मी नेहमी म्हणायचे, अप्पा मी
एम ए होणार ! व अनंत अडचणींवर मात करत मी एम ए झाले.
तेव्हा किती गर्वाने तुम्ही सांगत असत आमची “बाई” एम ए झाली.


तशी मी तुमची जास्तच लाडकी होते ! तुमच्याच ताटात
कितीतरी मोठी होई पर्यंत मी जेवत होते आठवते मला.घरी
आलात की मला दोन्ही पायांच्या चवड्यांवर उभे करून घरभर
फिरवत असत तुम्ही! मग जवळ समोर बसून तुमच्याच ताटात
जेवण. कित्ती लाड केले हो तुम्ही? पण मी त्याची परतफेड
(तुम्हाला अपेक्षित नसली तरी)केली का? मला वाटते, मी
अजून लक्ष द्यायला हवे होते का? पण माझ्या पेक्षा तीन मोठी
भावंडे( हो, मी घरात सगळ्यात लहान ना?)असल्यामुळे ही
कदाचित तशी मला गरज वाटली नसावी. आज जसा मी
विचार करू शकते तेव्हा तशी परिपक्वताही नव्हती ना?असो,
कुठे तरी मनात सल आहे हे नक्की!

पण जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा भावनिक व क्वचित
आर्थिक आधारही मी तुम्हाला दिला.माझ्या हातचा स्वयंपाक
तुम्हाला फार आवडायचा व तुम्ही तसे अक्काला बोलूनही
दाखवायचे. अक्का ही सुगरणच होती ना? असो, तुमची माझी
भावनिक गुंतवणूक इतकी होती की, शेवटच्या आजारपणात
अक्काने मला निरोप पाठवून बोलवून घेतले. मला तर तसे
गंभीर काही वाटलेच नव्हते. तुम्हाला अंजायना झाला होता.
औषधे चालू होती. मला वाटले नेहमी प्रमाणे तुम्ही याही आजारातून बाहेर पडणार, पण विधी लिखीत काही वेगळेच
होते. दोन तीन दिवस थांबून मी नाशिकला परतावे म्हणत
असतांनाच तुम्ही अचानक कोसळलात व मी हंबरडा फोडला.
माझ्या मांडीवरच तुम्ही शेवटचा श्वास सोडला, हाय रे दैवा!
हे मी काय पहात होते? “बाई, मला वाटे लावायला आलीस
का? “हे मी घरात आल्या आल्या उच्चारलेले शब्द तुम्ही खरे
करून दूरच्या प्रवासास , मला धक्का देऊन निघून
गेलात अप्पा! छत्तीस तास मी तुमच्या जवळच बसून राहिले
अप्पा! अश्रूंना खंड नव्हता. 😭 मी तर तुम्हाला जाऊच देत
नव्हते ना? पण लोक कसे ऐकतील? सगळ्यांनाच खूप रडवले मी! केवढा आधार होता तुमचा ! त्या दिवशी मी खरोखर निराधार झाले. पण काळ काही थांबत नाही. व जाणाऱ्या
बरोबर कुणाला जाता येत नाही. हेच अंतिम सत्य आहे.

तुमचीच लाडकी…
बाई

“ कालाय तस्मै नम: म्हणत थांबते.

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २ मार्च २०२३
वेळ सकाळी ११ .

प्रतिक्रिया व्यक्त करा