You are currently viewing आठवण कोऱ्या पानाची

आठवण कोऱ्या पानाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ. स्वाती घाटे लिखित आठवण कोऱ्या पानाची पुस्तक परिचय*

*आठवण कोऱ्या पानाची* *पुस्तक परिचय*

व्हाट्सअप समूहातून अनेक हितसंबंध जुळले, जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. त्यातलीच एक जवळची मैत्रीण डॉ. स्वाती घाटे…

डिसेंबर अखेर अचानक तिने एक पोस्ट टाकली. आठवण कोऱ्या पानाची, हा तिचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्याची. मला मनापासून खूप आनंद झाला. तिच्या कविता / गझल, यामधून तीचे वेगळेपण नेहमीच जाणवत होतं / असतं.

ती पोस्ट वाचून आधी तिचं भरभरून कौतुक / अभिनंदन केलं. नंतर हक्काने रागावले पण….
आधी का सांगितलं नाहीस, तुझा काव्यसंग्रह येतोय, वगैरे… असो

तिचा काव्यसंग्रह तितक्याच प्रेमाने मला भेट म्हणून पाठवला. वाचण्याची उत्सुकता होतीच.

तिच्या लेखनाप्रमाणेच पुस्तकाचं नांवही अगदी वेगळं. आठवण कोऱ्या पानाची… श्री. सुनिल खांडल यांचं आकर्षक मुखपृष्ठ, आणि ओजस गोदतवार यांचं प्रकाशन केलेला उत्तम काव्यसंग्रह माझ्या हातात आला. एकूण 69 कविता, एकापेक्षा एक सरस इथे वाचायला मिळाल्या.

आता हीच बघा ना..

*निळासावळा श्रीरंग* *कालिंदी वाहे काळी*
*वृंदावनात रास रंगतो आणिक टाळी*

*प्रत्येकीला भास हाच की* *तिचाच कृष्ण मुरारी*
*खट्याळ कान्हा अशी खेळतो* *गोपिकांशी खेळी*

. श्रीकृष्णाचं वर्णन, वृन्दावनात गोपिका खेळताना, टाळी, टिपरी दोन्ही वापरतात.
अजुनही आपण दांडिया /गरबा खेळतो. पण शब्दांची छानशी गुंफण या कवितेत केली आहे. कुठल्याही कवीला, कविता म्हंटलं की, कृष्ण, त्याच्या लीला, रासक्रीडा हे आठवतच. एकही कवी नसेल, ज्यांनी या विषयावर कविता लिहिली नाही.

पाऊस हा तर प्रत्येक कविचा आवडता विषय..
स्वाती त्यांच्या पाऊस या कवितेत म्हणतात…

*सरसर आल्या धारा* *आणिक भिजली माती*
*मनामनाचे सचैल रावे सुस्वर* *गाती*

*दूर करा हो रुक्षपणा तो* *आपसातला*
*जलधारांचे थेंब टपोरे हेच* *सांगती*

व्वा, पावसाच्या थेंबाबरोबर आलेले नवचैतन्य, आणि निसर्ग आपल्याला त्यातून एक संदेश देत असतो.
जसा जलधारांनी जमिनीचा रुक्षपणा नाहीसा होतो, आपणही आपल्यातला रुक्षपणा नाहीसा करावा.

डॉ. स्वाती एक संवेदनशील व्यक्ती आहे. हे या कवितेवरून कळतेच.

रोजरोज अवचित बाबा जातात भेटून
स्तिमीत होते माझी मीच जीव येतो दाटून

काम मी करते तेव्हा बघतात माझी सचोटी
पुढे पुढे जा म्हणतात राख तुझी हातोटी

काळीज कधी द्रवले तर हिंमत मला देतात
घेतला वसा टाकणार नाही,. वचन माझे घेतात.

काय बोलावं, मनातल्या सच्या भावना कवितेत डोकावल्याच ना? वडिलांनी पण किती उत्तम संस्कार दिलेत, याचीही प्रचिती येते.

स्त्रीचे मन उलगडणारी अशीच एक सुंदर कविता
विषय अगदी साधा सोप्पा…
धुणं धुणाऱ्या बायका

भिजत ठेवतात तासन तास
धुण्यासाठी कपडे
स्वप्नांचं घोंगडंही तसंच
दूर भिजत घालतात बायका

पिळतात करकचून घट्ट पिळे
शेवटच्या थेंबापर्यंत
जगणं सांभाळता सावरता
तशाच चिपाड होत जातात बायका

( मी प्रत्येक कवितेतलं एखादं दुसरं कडवं घेतलं, फक्त अंदाज येण्यासाठी )

खरंच, पूर्वीच्या बायका,. नदीवर कपडे धुवायला जायच्या. नवीन लग्न होऊन मुली, सुना, कपडे धुताना आपलं मन मोकळं करायच्या. येताना पुन्हा मन अगदी स्वच्छ, धुतलेल्या कपड्याप्रमाणे निर्मळ.
त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था उत्तम असे.
आता चार भिंतीत, बोलायला कोणी नसतं, वैयक्तिक कुणी कुणाला सांगत नाही. मन मोकळं होत नाही. तितका वेळही कुणाकडे नाही. असो…

तसेच या कवितेत पहा..

*एक पणती कणाकणाने* *झिजून गेली*
*वादळवारे आणि तडाखे* *विझून गेली*

*फूल उमलले घमघम त्याचे* *अत्तर झाले*
*पाकळी अता एक एक ती* *विरून गेली*

पणती बिचारी वादळवारे, तडाखे सोसत राहते, शेवटचा कण असेपर्यंत झीजत राहते.
स्त्री जन्माला उद्देशून, लिहिलेलं हे काव्य, खूपच सुंदर आहे.

पुस्तक ही एक गझल…

*आशेने मी धरते पुस्तक*
*माझ्यावर पण हसते* *पुस्तक*

*व्यवहाराने गणित घातले*
*सोडविताना हरते पुस्तक*

आपण प्रेमाने पुस्तक हातात घेतल्यावर खरंच ते हसतं, याचा दुसरा असाही अर्थ काढता येईल, आपल्याला जर काही येतंच नसेल तर.. उपहासानी पण आपल्यावर पुस्तक हसेलच ना…

तसेच व्यवहारात पुस्तकी ज्ञान चालतंच असं नाही. तेव्हा ते हरते, असंही म्हणता येईल.

गझलेच्या एकेका शेरावर दोन दोन, तीन तीन पानं सुद्धा लिहिता येतात.

पण इथे थोडया मर्यादा आहेत. म्हणून आता लेखणी थांबवते.

डॉ. स्वाती यांना नुकताच, बृहन्महाराष्ट्रा मंडळाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातल्या कार्याबद्दल, आपले उपमुख्यमंत्री, मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. यासाठी तिचे मनापासून हार्दिक अभिनंदन. पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा, लवकरच गझल संग्रह पण येईल, अशी आशा व्यक्त करते, आणि त्यासाठी खूप शुभेच्छा. थांबते 🙏🏻

माधुरी खांडेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा