रामी कोळेकरला शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…..

रामी कोळेकरला शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…..

संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट

संवाद मीडियाने दुर्गोत्सवात स्त्री-शक्ती हे सदर वाचकांच्या भेटीस आणले होते. यात वर्दीतली स्त्री शक्ती पासून समाजातील गोरगरीब वर्गाची देखील दखल घेतली होती. याच सदरात रामी कोळेकर या धनगर समाजातील कष्टकरी स्त्रीचे आयुष्य, तिच्या भावंडांसाठी तिची सुरू असलेली धडपड, मोडकळीस आलेल्या घराला प्लास्टिकचे आच्छादन करून कधीही पडेल अशा अवस्थेत असलेल्या छपराखाली दिवस काढताना तिची होणारी घालमेल, आणि मानसिक रुग्ण असलेल्या बहिणीला पोसताना, सांभाळताना होणारी रोजचीच तारेवरची कसरत, तरीही मासे, भाजी विक्री करून परिस्थितीपुढे गुडघे न टेकता कष्ट करून जीवन जगण्याचा तिचा प्रयत्न समाजापुढे मांडला होता.
संवाद मीडियाच्या या बातमीचा इतर कुठल्याही सामाजिक संस्था, ग्रुप, अथवा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी दखल घेतली नसली तरी सावंतवाडी शहरातील मुस्लिम समाजातील समाजकार्य करणाऱ्या काही व्यक्तींनी तिची दखल घेत समाजाच्या वतीने फुल न फुलांची पाकळी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. जीवनावश्यक वस्तू वाटप करत असताना कोणत्याही परिस्थितीत घेणाऱ्याला कमीपणा येऊ नये, आणि स्वतःची देखील प्रसिद्धी होऊ नये म्हणून मुस्लिम समाजातील या व्यक्तींनी फोटो अथवा इतर माध्यमांपासून अलिप्त राहत मदत केली हे नक्कीच अभिनंदनीय आहे.
आजकाल कोणाला मदत देताना राजकारणी व्यक्ती मदतीपेक्षा जास्त प्रसिद्धी करताना दिसतात परंतु प्रसिद्धी पेक्षा आपल्या मदतीला मूल्य देणाऱ्या या व्यक्तींनी मदत ही दुसऱ्यांना जाणीव करून देण्यासाठी नसते तर ते समाजाप्रती आपले असलेलं कर्तव्य आणि ईश्वराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केली जाते याची प्रचिती आणून दिली.
रामी कोळेकर हिला शहरातील मुस्लिम समाजातील समीरा खली, समान खान, अनिस शेख, समीर मुल्ला, अरबाज खान, शाहबाज काजरेकर इत्यादींनी जीवनावश्यक वस्तू देत मदतीचा हात दिला. रामी कोळेकर कुटुंबीय राहत असलेली मातीची झोपडी मोडकळीस आलेली असून पडण्याच्या मार्गावर आहे. छप्पर बऱ्याच प्रमाणात तुटलेले आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तिमत्वांकडून तिला घर बांधणीचे सामान अशी वस्तुरुप मदत मिळाल्यास तिच्या निवाऱ्याची सोय होईल, आणि तिचे असहाय्य, निराधार कुटुंब बेघर होण्यापासून वाचेल.
मुस्लिम समाजातील बंधू भगिनींकडून जशी मदत झाली तशीच मदत वस्तू रूपाने कोळेकर कुटुंबास करण्यासाठी इतरही लोकांनी पुढे यावे जेणेकरून आर्थिक आणि मानसिक चक्रव्यूहात अडकलेलं एक कुटुंब विवंचनेतून बाहेर पडेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा