इचलकरंजी / प्रतिनिधी :
तारदाळ – खोतवाडी परिसरातील सामाजिक प्रश्न सोडवण्याबरोबर सर्वसामान्य वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून प्रविण केर्ले यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता विकास कृती समितीची स्थापना करण्यात आली.
तारदाळ व परिसरात गेली पंधरा वर्षे सामाजिक कामामध्ये सदैव अग्रेसर असणारे प्रविण केर्ले यांनी समाजातील मुलभूत समस्या सोडवण्यासाठी राजमाता विकास कृती समितीची स्थापना केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मराठा आरक्षणातील नेतृत्व असो, इचलकरंजी परिसरातील निराधार असो किंवा निराधार महिलांसाठी व महिलांच्या बाबतीत होणारे तंटे पोलीस स्टेशनमार्फत व स्वतः कमिटी नेमून त्यामार्फत अनेकांचे संसार मोडताना वाचवले आहेत. त्याचबरोबर अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच त्यांचे शैक्षणिक प्रवेशापासून सर्व शैक्षणिक प्रश्नांची कामे करण्यात येत आहेत.कोरोना काळामध्ये बाधित रुग्णांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मोफत औषधोपचार देऊन कोविड सेंटरमध्ये त्यांना जेवणाची , राहण्याची सोय उपलब्ध करुन देत अनेकांना आधार देण्याचे काम प्रविण केर्ले यांनी केले आहे. याशिवाय जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने करत स्वतःवर पोलीस केसेस होऊनही समाजाला न्याय देण्याचे काम अगदी निरपेक्षपणे सदैव करत असतात.
पोलीस स्टेशनमार्फत महिलांचे अनेक विषय त्यांनी सोडवले आहेत. मोफत ऑपरेशन असो किंवा आरोग्य, रक्तदान शिबीर अशा समाजोपयोगी उपक्रमात ते नेहमी सक्रिय असतात. अनेक दिव्यांग बांधवांना त्यांनी पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच गरीब व गरजूंचे रेशनचे काम असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची विविध मदत त्यांच्याकडून होत असते. तसेच गरीब गरजूंना कोविड काळात व अडचणीच्या काळात धान्य व लागेल ती मदत करण्यास ते सदैव तत्पर असतात.
म्हणून आता या सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून राजमाता विकास कृती समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून समाजातील गरीब – गरजूंना न्याय मिळवून देतानाच विधायक कार्यातून चांगले समाज परिवर्तन घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे राजमाता विकास कृती समितीचे संस्थापक प्रवीण केर्ले यांनी सांगितले.