You are currently viewing उद्धवजी ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी असतील – सुभाष देसाई

उद्धवजी ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी असतील – सुभाष देसाई

कणकवलीत शिवगर्जना मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*अखेरपर्यंत मी उद्धवजी ठाकरे यांच्या सोबतच- आ.वैभव नाईक*

कणकवली :

उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यास भाग पाडणार्‍या मिंधे गटाच्याविरोधात जनतेच्या मनात चिड निर्माण झाली आहे. २०२४ साली ही जनता मतदानाच्या हक्कांचा वापर करून बेकायदा सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकारचा पाडाव करून मविआला बहुमतांनी विजयी करेल आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच असतील, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व्यक्त केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी शिवगर्जना मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी सुभाष देसाई बोलत होते. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रदीप बोरकर, रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख नेहा माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवानेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, संजना कोलते, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, राजु शेट्ये, राजू राणे, राजू राठोड, दिव्या साळगावकर यांच्यासह सेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सुभाष देसाई पुढे म्हणाले, शिवसेनेतील काही मंडळींनी गद्दारी व बेईमानी करून पक्षाचे नाव व चिन्ह चोरले. मात्र, त्यांना ठाकरे ब्रँड चोरता येणार नाही. भाजप हा पक्ष लोकशाहीला बुडविण्याचे काम करीत असून लोकशाहीला वाचवण्यासाठी भाजपच्याविरोधात रान पेटवण्याची गरज निर्माण झाली आहे. २०२४ साली भाजपला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत, ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. सिंधुदुर्गात शिवसेना संपविण्याची भाषा करणार्‍या नारायण राणे व त्यांच्या दोन पोरांची प्रतिमा लयास गेली, अशी टीका त्यांनी केली. मी आणि माझी दोन पोरं अशी त्यांची अवस्था झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांत शिवसेनेचा आमदार असेल, असेही ते म्हणाले. आज मातोश्रीवर अनेक निष्ठावंत येत आहेत. आंबेडकर चळवळीपासून कम्युनिस्ट आणि मुस्लिम संघटना तसेच दिल्ली, पंजाब राज्याचे मुख्यमंत्रीही येत आहेत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री संपर्कात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे न डगमगणारे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यापुढे काम करा असे आव्हान श्री. देसाई यांनी केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे सहा महिन्यापूर्वी 90 टक्के आमदार, खासदार सोडून गेले आणि त्या पक्षाचं चार दिवसापूर्वी चिन्ह गेलं, नाव गेलं तरीही लोक शिवसेनेवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित आहेत. हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अखेरपर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहीन. पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे आपण मतदारसंघात आणली आहेत. लोक आपल्या सोबत आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ४५० कोटीची कामे सुरू केली आहे. अनेक विकासकामे या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झाली. आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष आपल्यासाठी नवा नाही. यश निश्चितच मिळेल. परंतु, प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

सतीश सावंत म्हणाले, गेली काही वर्ष राणेंबरोबर असताना आम्ही सुद्धा विकास झाला असं सांगत होतो पण नरडवे धरण पंचवीस वर्षे झालं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते विकास कसा हवा, व्ही आर नंबर म्हणजे काय? इतर जिल्हा मार्ग म्हणजे काय? विकास कसा करावा हे आ. नितेश राणेना माहिती नाही. कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं की टक्केवारीसाठी नितेश राणे काम करतात असा टोला सतीश सावंत यांनी लगावला. पंजाबचे मुख्यमंत्री ओमगणेशवर येणार नाहीत कारण त्यांना मातोश्रीची ताकद माहिती आहे. असा खोचक टोला देखील सतीश सावंत यांनी राणेंना लगावला.

संदेश पारकर म्हणाले, भाजप हा शिवसेनेचा खरा शत्रू असून हा शत्रू शिवसेना संपविण्यासाठी विविध कारस्थाने करीत आहेत. भाजपने कितीही कारस्थाने रचली तरी ती यशस्वी होणार नाही. सिंधुदुर्गातील शिवसेना राजकीय दहशतवाद व अप्रवृतींच्या विरोधात लढा देत असून सिंधुदुर्गसह कोकणवासीयांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून २०२४ साली गद्दारांचा पराभव करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

अतुल रावराणे म्हणाले, शिवसेनेसाठी संघर्ष नवीन नाही.या परिस्थितीतही आपल्याला विजय मिळवायचा आहे. उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहायचे आहे. सर्वांनी जोमाने काम करून येत्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून आपली ताकद दाखवून देऊया असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नेहा माने, संजय पडते, नीलम सावंत-पालव यांनी उद्भव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने सुभाष देसाई व सेनेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शैलेश भोगले यांनी केले. आभार सुशांत नाईक यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा