You are currently viewing मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपणच पुढे येण्याची गरज – अनंत वैद्य

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपणच पुढे येण्याची गरज – अनंत वैद्य

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सावंतवाडीत रंगले कोमसापचे “तुतारी” कवी संमेलन

सावंतवाडी

डब्यात गेलेली इंग्रजी भाषा जर ज्ञान भाषा होऊ शकते, तर मराठीला तरी एवढे वाईट दिवस आले नाहीत. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्यालाच पुढे आले पाहिजे, असे आवाहन कोमसापच्या तुतारी कवी संमेलनात माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी आज येथे केले. दरम्यान मराठी भाषेसमोर इंग्रजी पेक्षा हिंदी भाषा आव्हाने निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या मातृभाषितच बोलण्याकडे कल ठेवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील केशवसुत कट्ट्यावर मराठी भाषा दिनानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हसके, सावंतवाडी अध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जी. ए. बुवा, सुभाष गोवेकर, विठ्ठल कदम, रुजारिओ पिंटो, उषा परब, वृंदा कांबळी, रुजारिओ पिंटो, दीपक पटेकर, नंदू गावडे, मंगल नाईक, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, नकुल पार्सेकर, अरुण पणदूरकर, सुरेश म्हस्कर, कल्पना बांदेकर आदींसह मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

श्री. वैद्य पुढे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी आता प्रत्येक साहित्यिकांवर अवलंबून आहे. इंग्रजी भाषा डब्यातील भाषा म्हणून गणली जात होती. आज बघता बघता तिला ज्ञान भाषेचा दर्जा मिळत आहे. त्यामुळे इंग्रजी एवढे तरी मराठी भाषेवर अद्याप वाईट दिवस आलेले नाहीत. ही भाषा आपण साहित्यातून समृद्ध केल्यास तशी परिस्थिती सुद्धा उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर इंग्रजीपेक्षा मराठी समोर हिंदीचे आव्हान मोठे आहे. आपण जाऊ तिथे साध्या चहाच्या टपरीवर सुद्धा हिंदी भाषेत संवाद साधतो. त्यामुळे मराठी भाषिकांनी यापुढे मातृभाचे संवाद साधल्यास त्याचा फायदा मराठी भाषा टिकण्यास होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माठेवाडा येथील शाळा नंबर दोन मधील विद्यार्थ्यांसह कोमसापाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथ दिंडी काढली. त्याला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे निवेदन मेघना राऊळ यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा