*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*महाराष्ट्राची संत संस्कृती आणि साहित्य*
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी…पुरातन काळापासून महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वांग्मयाचा दर्जा दिला आहे. संतांनी सामान्य माणसाला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देत संप्रदायाला जगभर पसरविले. विद्रोहातून परिस्थितीवर मात करत जनकल्याण या उदात्त भावनेतून संत साहित्याची निर्मिती झाली. संत साहित्यात रमणे म्हणजे विश्वरूप होऊन जगणे… यातून आत्मज्ञान मिळविणे आणि पुढे जात राहणे… हाच संत साहित्याचा मूळ उद्देश होय..! संत साहित्य हे आजच्या तत्त्वज्ञान आणि जीवन जगण्याच्या पद्धतीला पुरून उरेल असे आहे. समाज व्यवस्थेचे चित्र संत साहित्यातून स्पष्ट होते.
संत साहित्यातून आत्मज्ञान प्राप्त केलेला माणूस समाजाला चांगली दिशा देऊ शकतो आणि संतसाहित्यच माणसाचे डोळे उघडे करू शकते. म्हणून तर शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेले संत साहित्य आजही जनमानसात आपले स्थान अबाधित राखून आहे.
*”ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस”* संत ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला तर तुकोबारायांनी त्यावर कळस चढविला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला संघटित रूप दिले, तर संत श्री.तुकाराम महाराजांनी लोकोद्धारासाठी देवाच्या दारात दंगाच मांडला. अशा या संतभुमी महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत चोखा, समर्थ रामदास स्वामी, संत गाडगेबाबा, संत सोयरोबानाथ आंबिये असे अनेक थोर संत साहित्यिक होऊन गेले. ज्यांनी समाजाला दिशा देण्याचे असामान्य असे काम केले आहे. संतांनी समाजातील दुःखांना आणि वेदनेला आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वाचा फोडली… म्हणून तर सुरेश भट म्हणून गेले आहेत…
*”माझिया गितात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुले यावे…”*
अशा या संत विभुतींचे महाराष्ट्रावर अनन्यसाधारण उपकार आहेत.
याच संतांच्या मांदियाळीतील एक महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर…! संत ज्ञानेश्वर हे प्रसिद्ध मराठी संत कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्वज्ञ कवी. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग या त्यांच्या काव्यरचना. *”जो जे वांछील तो ते लाहो”* असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना संपूर्ण वारकरी संप्रदायात प्रेमाने “माऊली” असे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. सर्वसामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी भगवद्गीतेचे मराठी मध्ये रूपांतर केले. ज्ञानेश्वरांनी सिद्धांतातून परमार्थ व दृष्टांतातून प्रपंच शिकविला आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी काठी संजीवन समाधी घेतली.
संत नामदेव म्हणजे नामवेद, नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत कवी. संत नामदेव म्हणजे *”श्री.विठ्ठलाचा अगदी जवळचा सखा”* अशी त्यांची ख्याती होती. विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होत.
*”नाचू कीर्तनाच्या रंगी… ज्ञानदीप लावू जगी”*
हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. संत नामदेवांनी भागवत संप्रदाय पंजाब प्रांतापर्यंत नेण्याचे काम केले आहे. पंजाब आणि राजस्थान मधील शीख बांधवांनी त्यांची मंदिरे उभारली आहेत. तिथे त्यांना “नामदेव बाबा” असे म्हणत. संतश्रेष्ठ संत नामदेवांना *”संत शिरोमणी”* या नावाने ओळखले जाते. संत जनाबाई तर स्वतःला *”नामयाची दासी”* म्हणवून घेत.
*”तुका झालासे कळस ! भजन करा सावकाश !”*
पंढरपूरचा विठोबाला आराध्य दैवत मानत असलेले संत तुकाराम वारकरी संत व कवी होत. विठ्ठल भक्तीत लीन असणाऱ्या संत तुकारामांच्या आयुष्यात अनेक संकटे आली परंतु त्यांच्या भक्तीत खंड पडला नाही. संत तुकारामांनी अनेक अभंग रचना लिहिल्या…भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीती या विषयांना अनुसरून लिहिलेले त्यांचे अभंग “तुक्याचे अभंग” म्हणून आजही सर्वोंमुखी आहेत. जसे वामनाचे श्लोक, ओवी ज्ञानेश्वरांच्या तसे अभंग लिहावेत ते तुकोबांनी… संत बहिणाबाई या त्यांच्या शिष्या होत.
“जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत !!”
*”त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा… त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा”* ही श्री दत्ताची आरती लिहिणारे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत व कवी म्हणजे संत एकनाथ…! *”एका जनार्दनी”* ही संत एकनाथ यांचीच नाममुद्रा… *”एकनाथी भागवत”* हा संत एकनाथांचा लोकप्रिय ग्रंथ..! संत एकनाथांनी *”बये दार उघड”* असे म्हणत अनेक अभंग रचना, भारुडे, गोंधळ, जोगवा, गवळणी यांच्या सहाय्याने जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या भारूड, गोंधळ, जोगवा आदींच्या माध्यमातून जीवनभर प्रयत्न केले. नाथांची लेखणी लोकोद्धारासाठी झिजली, तळमळली, तळपली देखील. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे काम संत एकनाथांनी केले त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक हा मान संत एकनाथ यांनाच दिला जातो.
*कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी ॥*
*लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥*
संत सावता माळी यांची ही अजरामर झालेली रचना… भाजी, फळे, फुले काढण्याचा व्यवसाय असणारे संत सावता विठ्ठल भक्तीमध्ये रममाण असायचे.
*”आमची माळीयाची जात, शेत लावू बागाईत !”*
असे आपले एका अभंगात म्हणणारे संत सावता हे “कर्तव्य व कर्म करीत राहणे” हीच ईश्वर सेवा अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत होते.
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. स्त्रिया दळण दळताना, कांडताना संत जनाबाईंच्या ओव्या गातात.
संत मुक्ताबाई या संत निवृत्ती श्रीज्ञानेश्वर व सोपान यांच्या भगिनी. संत मुक्ताबाईंचे ४२ ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत.
पायाने जरी चिखल तुडवत संसारात दंग असले तरी विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन विठ्ठल चरणाशी ध्यान लागलेले… संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत कसे स्वतःला विसरून जातात या त्यांच्या तन्मय वृत्ती बद्दल सांगताना संत नामदेव लिहितात की…
*प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत।*
*प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।।१।।*
*असे घराश़मी करीत व्यवहार*
*न पडे विसर विठोबाचा ।।२।।*
संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत.
संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे संस्थापक कवी होते. संत रामदास यांनी साधकावस्थेत असतानाच श्रीरामांची प्रार्थना केली होती, यालाच आपण *”करुणाष्टके”* म्हणतो. संत रामदासांनी गावोगावी जाऊन शक्ती आणि बुद्धीची देवता श्री हनुमानाची अनेक मंदिरे बांधली. पर्यावरणावर ही त्यांनी अनेक प्रबोधन व लिखाणे केली आहेत. संत रामदासांनी *”दासबोध”* व *”मनाचे श्लोक”* अशा साहित्यांची निर्मिती केली आहे. *”जय जय रघुवीर समर्थ”* हे त्यांचे प्रसिद्ध वचन होते. *”लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा”* ही भगवान श्री शंकराची आरती संत रामदास स्वामी यांनीच लिहिली. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, अनेक अभंग, करुणाष्टके, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, आरत्या त्यांनी रचल्या आहेत.
अशा अनेक संतांपैकीच गाडगे महाराज हे देखील एक संत आहेत संत गाडगे महाराज यांना थोर संत कीर्तनकार व समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. *”मी कोणाचा गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही”* असे म्हणणारे संत गाडगे महाराज नेहमीच आपल्या बोली भाषेतून कीर्तनाद्वारे लोक जागृती करत असत. संत गाडगे महाराजांनी स्वच्छता व चरित्र ही शिकवण दिली. अंधश्रद्धा गोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा यांना दूर करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले होते दृश्यता व जातीभेद पाडू नका असे ते आपल्या कीर्तनातून नेहमीच सांगायचे. *”गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला”* हे आवडीचे भजन गाणारे संत गाडगे महाराज यांच्या बद्दल बोलताना आचार्य अत्रे यांनी असे सांगितले आहे की, *”सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात…!”*
*”हरी भजनावीण काळ घालवू नको रे… अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे…”*
हे प्रसिद्ध भजन लिहिणारे गोवा आणि कोकण प्रांतातील संत सोहिरोबानाथ आंबिये… संत नरहरी सोनार… संत भानुदास… संत मीराबाई असे अनेक संत महाराष्ट्राच्या या भूमीत होऊन गेले. त्यामुळेच महाराष्ट्राच्या भूमीला संतांची परंपरा लाभली असल्याचे म्हटले जाते. माय मराठीला लाभलेले संत साहित्य हे इतिहासात अजरामर झालेले आहे.
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६