You are currently viewing गोवा कार्निवलच्या धर्तीवर मालवणात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

गोवा कार्निवलच्या धर्तीवर मालवणात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

संस्कृती, लोककला, देखावे, चित्ररथ यांचा होणार मिलाप

मालवण

गुढीपाडव्या निमित्ताने २२ मार्च रोजी हिंदू संस्कृती आणि लोककलांचा मिलाफ असणारी भव्य-दिव्य अशा स्वरुपाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण येथे काढण्यात येणार आहे. गोव्यामधील कार्निवलच्या धर्तीवर यंदा विविध देखावे यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

भरड येथील दत्त मंदिर येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाऊ सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, सौगंधराज बादेकर, संदीप बोडवे, अमित खोत, राजू बिडये, कृष्णा ढोलम, ललित चव्हाण, दुर्गेश गावकर, सुनील पोळ, भिवा शिरोडकर, राजन कामत, गणेश मेस्त्री, हर्षद हळदणकर, सुशांत तायशेटे आदी उपस्थित होते. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत यंदा वारकरी पंथाचे स्त्री-पुरुष वारकरी बांधव, वारकरी वेशभूषेत स्वागत यात्रेत सामील होणार आहेत. याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी संप्रदायाचे सहकारी सुनील पोळ यांच्याकडे देण्यात आली. त्याचप्रमाणे यंदा विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाचे कार्यकर्तेही हातात भगवा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी होणार असल्याचे मालवण बजरंग दल प्रमुख हर्षद हळदणकर यांनी सांगितले. सांस्कृतिक, ऐतिहासिक व स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करण्यात यावे. रॅलीत मोठ्या संख्येने मुले सहभागी व्हावीत यासाठी शहरातील प्रशालांना भेटी देण्याची सूचना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि दीपक पाटकर यांनी केली.

शोभायात्रेच्या नियोजनाप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून त्याचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा भरड दत्त मंदिर येथे २ मार्च रोजी नियोजन बैठक घेण्यात येणार आहे. शोभायात्रेचे यंदाचे हे विसावे वर्ष आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने हिंदू प्रेमी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शोभायात्रा समन्वयक भाऊ सामंत यांनी केले आहे

राजपथावर संचलन केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनीही संपर्क करून स्वागत यात्रेत सहभागी करण्यात यावे, अशी कल्पना राजू बिडये यांनी मांडली. त्याचप्रमाणे गोव्यात होणाऱ्या कार्निवलच्या धर्तीवर शोभायात्रेत विविध देखावे असावेत अशी ही सूचना यावेळी अनेकांनी केली. ढोल पथक, चित्ररथ, सजविलेले उंट घोडे आणि बैलगाड्या यांच्या प्रमुखांना संपर्क साधण्याचेही ठरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा