कणकवली
सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात हल्लीची तरुण पिढी नवनवीन प्रयोग करू पाहत आहे. सिंधुदुर्ग मधील शिरिष गवस आणि पूजा गांवकर-गवस असेच एक जोडपे याच उद्देशाने आपले मुंबईतले चालू करिअर सोडून वर्षभरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी स्थायिक झाले आणि त्यांनी यु ट्यूब आणि इंस्टाग्राम वर रेड सॉईल स्टोरीज (“Red Soil Stories” ) नावाचे चॅनेल सुरू केले.
कोकणातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली, येथील खाद्यसंस्कृती, येथील निसर्ग आणि जैवविविधता एका कलात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडत आहेत . हे सुंदर चॅनेल महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जगभरातल्या 40 पेक्षा जास्त देशामध्ये सध्या पाहिले जात आहे.
त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. शिरीष आणि पूजा वर चित्रित झालेला हा भाग सोमवार व मंगळवार दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी ला रात्री ९.३० ते १०.३० वाजता झी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. यात पूजा आणि शिरिष यांच्या सोबत लोकप्रिय शेफ विष्णू मनोहर, मधुरा रेसिपी फेम मधुरा बाचल, अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, शेफ अर्चना आर्ते, शेफ स्मिता देव अशा नामांकित पाहुण्यांनी सहभाग घेतला आहे.
या आधी पूजा ही फिल्म इंडस्ट्री मध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होती तर शिरिष हा फार्मा इंडस्ट्रीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता .
आपल्या मातीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा या ध्येयाने आपल्या चालू करिअरला तिलांजली देत ग्रामीण भागातील शाश्वत जीवनशैली जगासमोर मांडून हे दांपत्य एक नवीन आदर्श सर्वांसमोर ठरत आहे.