कुडाळ :
अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या दक्षिण भारतातील श्री अंजनेया स्वामी ट्रस्ट, तिरूवत्तार कन्याकुमारी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य अशी मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमातून कुडाळ तालुका पत्रकार समिती यांचा एक आठवड्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.
सदर दौऱ्यामध्ये सिंधुदुर्गातील पत्रकार कन्याकुमारी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, श्री अंजनेया स्वामी ट्रस्ट यांचा नियोजित भव्य हनुमान मंदिर तथा मेडिटेशन सेंटरचा प्रकल्प, दक्षिण भारतातील अग्रगण्य अशा नामांकित शैक्षणिक संस्था, परफेक्ट अकॅडमीच्या दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शाखा यांना भेटी देणार आहेत.
परफेक्ट अकॅडमी दक्षिण भारत तसेच गोवा आणि कोकण येथील अग्रगण्य नामांकित संस्था असून, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची जेईई , नीट एनडीए, एम एच टी सी इ टी, अशा परीक्षांची तयारी परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर तसेच 1800 हुन अधिक विद्यार्थ्यांना, आयआयटी तथा एनआयटी मध्ये प्रवेश मिळाला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यातील विकसित शिक्षण पद्धती कोकणात देखील आणता यावी असा परफेक्ट अकॅडमीचा मानस आहे.
श्री अंजनेया स्वामी स्पिरिट्युअल ट्रस्ट दक्षिण भारतातील प्रसिद्ध संस्था आहे. श्री अंजनेया सिद्धार्थ स्वामी (श्री संतोष कुमार) यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिन्दाश्रीकुमार यांनी या ट्रस्टची स्थापना केली. याच्या माध्यमातून भारतातील विविध भागात, मेडिटेशन शिबिरे, आरोग्य शिबिरे, तसेच रोजगार मेळावे इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील, मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी मोफत मेडिटेशन शिबिर या ट्रस्ट मार्फत घेण्यात आले.
कन्याकुमारी येथे ट्रस्ट तर्फे श्री हनुमंताचे मंदिर, ध्यान मंडप, 80 फुटाची हनुमंताची मूर्ती, असा भव्य पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
अशा प्रकल्पामधून, प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे कशी अजून जगासमोर ठेवता येतील, हे देखील या दौऱ्यातून साध्य करता येणार आहे.
या दौऱ्यामध्ये कुडाळ तालुक्यातील दहा नामवंत पत्रकार समाविष्ट होणार असून, या दौऱ्याचा उपयोग केरळ तामिळनाडू येथील अध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी होईल, अशी माहिती परफेक्ट अकॅडमी चे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांनी दिली.