You are currently viewing साटेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका

साटेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील साटेली खालचीवाडी भागातील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदर बिबट्या रात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शनिवारी सकाळी साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असलेबाबत सावंतवाडी वन विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल सदर बिबट्याच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता विहीरीत पूर्णवाढ झालेला अंदाजे अडीच वर्षे वयाचा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. सदर बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असे दिसून आले.

सदर बिबट्या विहिरीत पाईपच्या सहाय्याने लोंबकळत राहिला होता. त्याला तरंगण्यासाठी तत्काळ लाकडाचा ओंडका विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर सदर बिबट्याचा त्या भागात अधिवास असल्याकारणाने त्याला विहिरीतून बाहेर येण्यासाठी शिडी व त्याला जोडलेल्या लाकडांचा आधार देऊन विहिरीत सोडण्यात आले. त्या शिडीचा आधार घेऊन बिबट्या विहिरीच्या बाहेर यशस्वीरीत्या बाहेर आला व त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला.
बिबट हा आपल्या जैवविविधतेतील सर्वेच्च भक्षक असून तो आपली जीवसृष्टी संतुलित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्ग वासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी यावेळी केले.

या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल नागेश खोराटे, आप्पासाहेब राठोड, संग्राम पाटील, प्रकाश रानगिरे, महादेव गेजगे, बबन रेडकर, पडते भाऊ यांनी सहभाग घेतला. त्यांना स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा